मुंबई: कंगना रनौत आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यांनी आणि सोशल मीडियातील पोस्टच्या माध्यमातून नेहमी चर्चेत राहते. कधी ती बॉलिवूडशी संबंधित खळबळजनक वक्तव्य करते तर कधी तिच्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापतं. गृहिणींच्या कामाला मोल मिळावं हा विषय चर्चेत येत असताना त्यावरुन कंगनाने कॉंग्रेस नेता शशी थरुर यांच्यावर निशाणा साधला होता. कंगनाच्या या टीकेला आता शशी थरुर यांनीही उत्तर दिलंय.
कमल हसन याने आगामी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात करत गृहिणींच्या कामाला वेतनाचा दर्जा देण्याचं आश्वासन दिलं होतं. शशी थरुर यांनी कमल हसनच्या या कल्पनेचं स्वागत करत त्याला पाठिंबा दिला होता. त्यावरुन कंगना रनौतने टीका केली होती. तिने म्हटले होते की, "आम्ही आपल्या लोकांची काळजी घेतोय, त्याची किंमत करु नका. प्रत्येक गोष्टीकडे व्यवहाराच्या दृष्टीने बघू नका."
कंगनाची कमल हसन आणि शशी थरुर यांच्यावर टीका, घरकामाला प्राइस टॅग लावू नका
कंगनाच्या या टीकेला आता शशी थरुर यांनी उत्तर दिलंय. शशी थरुर यांनी कंगनाला उद्देशून म्हटलंय की, "जे लोक आपल्यांची काळजी घेतात त्याची किंमत कधी करु नये या आपल्या मताशी मी सहमत आहे. पण जे लोक काम करतात पण त्याचं मोल त्यांना मिळत नाही अशा लोकांशी संबंधित हा विषय आहे. तसेच प्रत्येक महिलेकडे बेसिक इनकम असावे. प्रत्येक भारतीय महिला आपल्याप्रमाणे सशक्त असावी अशी माझी इच्छा आहे."
गृहिणींच्या कामाला प्रतिष्ठा मिळवून देऊन त्यांच्या कामाला वेतनाचा दर्जा देण्याच्या कमल हसनच्या आश्वासनानंतर हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. नुकतेच एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानेही कमल हसनच्या कल्पनेशी सुसंगत निकाल दिला आहे. शशी थरुर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत करुन त्यावर आनंद व्यक्त केलाय.