पोरबंदर : गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या एका उमेदवाराने बाजी मारली आहे. महात्मा गांधीजींचं जन्मगाव असणाऱ्या पोरबंदरमधील कुटियाना विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कांधल जाडेजा हे विजयी झाले आहेत. कांधल हे गुन्हेगारी विश्वात 'गॉडमदर' म्हणून ओळख असणाऱ्या संतोकबेन जाडेजाचे पुत्र आहेत.

कांधल जाडेजा यांनी भाजपच्या लखमन ओडेदरा यांचा 23 हजार 709 मतांनी पराभव केला, तर काँग्रेसचे वेजाभाई मोडेदरा हे तिसऱ्या स्थानावर राहिले. कांधल हे कुटियानातूनच मागच्या वेळीही आमदार होते. त्यामुळे या विजयाने त्यांनी एकप्रकारे आपली जागा कायम राखण्यात यश मिळवले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने गुजरातमध्ये एकूण 72 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी केवळ पोरबंदर जिल्ह्यातील कुटियाना मतदारसंघातील जागा जिंकता आली.

याआधीही राष्ट्रवादीने दोनवेळा गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती. 2007 साली पहिल्याच वेळी 3 आमदार, 2012 साली 2 आमदार विजयी झाले होते आणि आता म्हणजे 2017 साली 1 आमदार निवडून आला आहे. त्यामुळे आधीच्या जागाही राष्ट्रवादीला राखता आल्या नाहीत.

गांधींच्या पोरबंदरमध्ये 'गॉडमदर'चा मुलगा विजयी

कांधल जाडेजा यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झाल्यापासून ते चर्चेत राहिले. त्याला दोन महत्त्वाची कारणं आहेत, एक म्हणजे, महात्मा गांधींचा वारसा ज्या जिल्ह्याला लाभला आहे, त्या पोरबंदर जिल्ह्यातील कुटियाना मतदारसंघातून कांधल उभे होते आणि दुसरं कारण म्हणजे, कांधल हे गुन्हेगारी विश्वातील 'गॉडमदर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतोकबेन जाडेजाचे पुत्र आहेत. आता राष्ट्रवादीच्या तिकिटावर कांधल विजयी झाले असल्याने ते कुटियानाचं पुन्हा एकदा नेतृत्त्व करणार आहेत. ते याच मतदारसंघातून राष्ट्रवादीचेच आमदार होते.

'गॉडमदर' संतोकबेन जाडेजा कोण होती?

1980-90 च्या दशकात गुजरातमधील पोरबंदर भागात संतोकबेन जाडेजाची प्रचंड दहशत होती. पतीच्या हत्येनंतर संतोकबेनच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं, मात्र त्यानंतर गुन्हेगारी विश्वात पाऊल ठेवून डझनहून अधिक हत्यांचे डाग त्यांनी कपाळी लावले. 2011 साली हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूमुखी पडलेल्या या कुख्यात 'लेडी डॉन'चा प्रवास भयंकर दहशतीचा आहे.

संतोकबेनच्या पतीचं म्हणजे सरमन मुंजा जाडेजा हे महेर समाजाचे नेते होते. मात्र नंतर त्यांनी पुढे गुन्हेगारी विश्वात पाऊल टाकलं आणि 1986 च्या डिसेंबर महिन्यात काळा केशव गँगने टोळीयुद्धातून त्यांची हत्या केली. पतीच्या हत्येचा बदला म्हणून संतोकबेनही गुन्हेगारी विश्वात आली आणि कुख्यात 'लेडी डॉन' बनली.

गुन्हेगारी विश्वातील कुख्यात कारवायांमध्ये 14 हत्या तिच्या नावावर आहेत. यातले अनेकजण विरोधी टोळीतले आहेत. सत्तेसाठी तिच्या पतीची हत्या केल्याच्या रागातून तिने या हत्या केल्या. बलात्काऱ्यांना आसरा दिल्याचाही तिच्यावर आरोप होता.

1990 ते 1995 या काळात संतोकबेन गुजरात विधानसभेत आमदार म्हणूनही गेली होती. पोरबंदर जिल्ह्यातील ती पहिली महिला आमदार होती.

संतोकबेनवर 1999 साली 'गॉडमदर' नावाचा सिनेमाही येऊन गेला. फारसा चालला नसला, तरी या सिनेमाची चर्चा खूप झाली. यात संतोकबेनच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी होत्या. या सिनेमातील भूमिकेसाठी शबाना आझमींना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या राष्ट्रीय पुरस्कारही गौरवण्यात आले होते.

एकंदरीत, सत्य आणि अहिंसेची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधीजींच्या पोरबंदर जिल्ह्यातील 'संतोकबेन जाडेजा' नावाचा हिंस्र आणि कुख्यात इतिहास 2011 साली संपला. 31 मार्च 2011 साली संतोकबेन हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूमुखी पडली. याच संतोकबेन जाडेजाचा मुलगा कांधल जाडेजा आता राष्ट्रवादीच्या तिकिटावर गुजरात विधानसभेत कुटियानाचं पुन्हा एकदा प्रतिनिधित्त्व करणार आहे.