गांधीनगर : गुजरातमधील विधानसभा निवडणुकांमध्ये लिंबायत मतदारसंघातून मराठमोळ्या महिलेने विजय मिळवला आहे. भाजपच्या उमेदवार संगीता राजेंद्रभाई पाटील यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला पराभवाची धूळ चारली.


काँग्रेसच्या रविंद्र सुकलाल पाटील यांचा संगीता पाटील यांनी तब्बल 31 हजार 951 मतांनी पराभव केला. संगीता पाटील सलग दुसऱ्यांदा आमदारपदी निवडून आल्या आहेत.

संगीता पाटील या धुळ्यातील शिरपूर तालुक्यातल्या अर्थे गावातल्या माहिरवाशीण आहेत. खानदेशकन्येने मिळवलेल्या घवघवीत यशामुळे महाराष्ट्राची मानही अभिमानाने उंचावल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

संगीता पाटील यांना 93 हजार 585 मतं मिळाली, तर काँग्रेसच्या रविंद्र पाटलांना 61 हजार 634 प्राप्त झाली. राष्ट्रवादीचे अक्रम अन्सारी तिसऱ्या क्रमांकावर आहेत, तर शिवसेनेच्या सम्राट पाटील यांना चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. त्यांना अवघी 4 हजार 75 मतं मिळाली.

गेल्या वेळीही काँग्रेस उमेदवार सुरेश मोहन यांचा संगीता पाटील यांनी मोठ्या फरकाने पराभव केला होता.

2008 मध्ये पुनर्निर्मितीनंतर लिंबायत हा मतदारसंघ अस्तित्वात आला. त्यामुळे 2012 मध्ये पहिल्यांदाच इथे निवडणूक झाली होती. मराठी आणि मुस्लिम बहुल भाग असल्यामुळे भाजपने संगीता पाटील यांना उमेदवारी दिली होती.



संगीता पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाताना झांशीची राणी लक्ष्मीबाई यांचा पेहराव करुन घोड्यावरुन मिरवणूक काढली होती. त्यामुळे आचारसंहिता भंग केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला, मात्र निवडणुकीत प्राण्यांचा वापर होत असल्याचं सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना दिलासा दिला.

नोटाबंदी आणि जीएसटीमुळे व्यापारी वर्ग भाजपवर नाराज आहे. निवडणुकीत भाजपला या नाराजीचा फटका बसल्याचा अंदाज वर्तवला जात होता. मात्र इथेच 16 पैकी 14 जागा मिळवत भाजपने धक्का दिला.