Kalicharan On Hindu Religion: महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कालिचरण महाराजाने पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. अलिगडमधील संत समागममध्ये बोलताना कालिचरणनं म्हटलं आहे की, हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी सर्व हिंदूंनी एक व्हायला हवं. धर्माच्या आधारे मत द्यायला पाहिजे. भारतात केवळ सनातन धर्म आहे. इस्लाम, ख्रिश्चन हे धर्मच नाहीत, असं वक्तव्य कालिचरणनं केलं आहे.
कालिचरणनं यावेळी म्हटलं आहे की, देशाला इस्लामकडे घेऊन जात आहेत. देशात पाच लाख मंदिरं तोडली आहेत आणि 800 वर्षात 80 हजार महिलांसोबत बलात्कार झाला आहे. जर हिंदू राष्ट्र बनलं नाही तर असं होतच राहिल. राजकीय इच्छाशक्तीतून हिंदू राष्ट्राची स्थापना होऊ शकते असं त्यानं म्हटलं आहे. इराक, इराण, अफगानिस्तान आणि पाकिस्तानसह जगातील अनेक देश आपल्या हातातून गेले आणि मुस्लिम राष्ट्र झाले, असं कालिचरणनं म्हटलं आहे.
महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानं खाल्ली होती जेलची हवा
मागील डिसेंबर महिन्यात महात्मा गांधींबद्दल कालिचरण महाराजाने वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळं त्याला जेलची हवा खावी लागली होती. महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत त्यानं म्हटलं होतं की, मी नथूराम गोडसे यांना सलाम करतो की त्यांनी महात्मा गांधींची हत्या केली. यानंतर अनेक ठिकाणी कालिचरण विरोधात गुन्हे दाखल झाले होते. नंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती.
काही दिवसांपूर्वी कालिचरण महाराजाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. शिवतांडव स्त्रोतामुळे कालीचरण महाराज अधिक प्रसिद्ध झाला होता. 'कालीचरण महाराज' अकोल्यातील जुने शहर भागातील शिवाजीनगर मध्ये 'भावसार पंचबंगला' भागात राहतो. अकोल्यातील तरुणाईमध्ये या महाराजांची मोठी क्रेझ आहे. मात्र, कालीचरण महाराज आपल्या भूतकाळाविषयी फारसं काही कुणाला सांगत नाहीत. त्याचे मूळ नाव 'अभिजीत धनंजय सराग' असं आहे. शिक्षणाचे आणि अभिजितचे सख्य फारसं जमले नाही. त्याला शाळेतही जाण्याचा कंटाळा यायचा. लहानपणापासून त्याचा ओढा अध्यात्माकडे अधिक होता. त्यातही तो कालीमातेची आराधना करायचा. पुढे अभिजीतचा 'कालीपुत्र कालीचरण' झाला. लोकांनी त्यांना 'महाराज' असे संबोधने सुरू केले. या कालिचरण महाराजाने 2017 मध्ये अकोला महापालिकेची निवडणूक लढवली होती. मात्र, पराभवाचे तोंड पाहावे लागले.