नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टातील दुसरे सर्वांत वरिष्ठ  न्यायमूर्ती जस्टी चेलमेश्वर हे आज निवृत्त झाले. काही दिवसांपूर्वी न्यायमूर्ती जस्टी चेलमेश्वर यांच्या नेतृत्वात सुप्रीम कोर्टाच्या चार वरिष्ठ न्यायमूर्तींनी घेतलेल्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेने देशातील वातावरण ढवळून निघाले होते.

“पत्रकार परिषद घेतल्याचा मला कोणताच पश्चाताप होत नाही, कारण मी नेहमीच व्यवस्था सुधारण्यासाठी काम केलं आहे,” असं निवृत्त होताना न्यायमूर्ती चेलमेश्वर यांनी म्हटलं आहे. कार्यकाळ संपताच न्यायमूर्ती चेलमेश्वर यांनी दिल्लीतील आपलं सरकारी निवासस्थान सोडलं आहे.

आता आंध्र प्रदेशातील आपल्या मूळ गावी राहण्याची त्यांची इच्छा आहे. तसंच यापुढे कोणतंही सरकारी पद घेणार नसल्याचंही न्यायमूर्ती चेलमेश्वर यांनी स्पष्ट केलं.

निवृत्त होताना त्यांनी काही महत्त्वपूर्ण विधाने केली आहेत.

"पत्रकार परिषदेचा पश्चाताप नाही"

“इतर न्यायमूर्तींसोबत मीडियासमोर आल्याबद्दल कोणताही पश्चाताप नाही, कारण देशातील सर्वांत मोठ्या न्यायालयात पण काहीतरी अडचण आहे, हे मला लोकांसमोर आणायचे होते,” असं त्यांनी म्हटलं आहे.

"न्यायालयावर संकट नाही"

न्यायालयावर संकट कोणतंही नाही, असा दावा करत ते म्हणाले, “काळ येतो आणि काळ बदलत असतो. आणीबाणीत तयार झालेल्या परिस्थितीबाबत मी माझ्या प्राध्यापकांकडे चिंता व्यक्त केली होती. त्यावेळी ते प्राध्यापक म्हणाले होते,जर्मनीतील हिटलरचा काळ यापेक्षा भयंकर होता. त्यामुळे केवळ काही गोष्टींमुळे न्यायपालिकेवर संकट आहे ,असं मला वाटत नाही.”

"न्यायाधीश  के एम जोसेफ हे न्यायमूर्ती बनन्यास योग्य"

उत्तराखंड हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश असलेले के एम जोसेफ हे सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती बनण्यास योग्य असल्याचं न्यायमूर्ती चेलमेश्वर यांनी म्हटलं आहे. “सरकाने जोसेफ यांचे नाव डावलताना दिलेली कारणे योग्य नाहीत,” असंही ते म्हणाले.

न्यायमूर्ती गोगोई सरन्यायाधीश बनण्याची आशा"

वरिष्ठतेच्या आधारावर दीपक मिश्रा यांच्यानंतर रंजन गोगोई हे सरन्यायाधीश बनू शकतात. मात्र याबाबतची शिफारस करण्याचा पूर्ण अधिकार हा  सरन्यायाधीशांचाच असतो. या निवडीबाबत चेलमेश्वर यांना विचारलं असता ते म्हणाले, “कोणत्या नावाची शिफारस करायची हा पूर्णपणे सरन्यायाधीशांचा अधिकार आहे. या पदावर वरिष्ठ न्यायमूर्तींची निवड होणार नसेल तर त्याचे कारणही सरन्यायाधीशांना द्यावे लागेल. पण जेष्ठता डावलून ही निवड होईल, असं मला वाटत नाही.”