चेन्नई : तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री ओ पन्नीरसेल्वम यांनी दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या तपासाची सूत्रं निवृत्त न्यायाधीशांकडे असणार आहेत.

आपण पक्षाला कुठलाही दगा दिला नसल्याचं स्पष्टीकरणही पन्नीरसेल्वम यांनी दिलं आहे. गावागावांमध्ये जाऊन पक्षाच्या बांधणीसाठी काम करत जयललितांच्या मार्गावरच चालणार असल्याचं पन्नीरसेल्वम यांनी म्हटलं आहे.

आपल्याकडून बळजबरीनं मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा घेतल्याचा आरोप पन्नीरसेल्वम यांनी मंगळवारीच केला होता. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शशिकला यांनी आमदारांची बैठक बोलावली आहे.

पन्नीरसेल्वम यांनी जयललितांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर आक्रमक पवित्रा घेतला होता. मी मुख्यमंत्री व्हावं, अशी अम्मांची इच्छा होती, पण दबाव टाकून माझ्याकडून राजीनामा घेतला, असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.

जयललिता यांची निकटवर्तीय शशिकला नटराजन मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाल्यानंतर तामिळनाडूच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. त्यातच पन्नीरसेल्वम यांनी पहिल्यांदाच त्यांचं मत जाहीरपणे सांगितलं. शिवाय राज्य आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी साथ दिली, तर राजीनामा मागे घेऊ, असंही त्यांनी म्हटलं आहे.

शशिकला नटराजन यांचा शपथविधी बुधवारी होणार नाही, अशी माहिती नुकतीच समोर आली होती. त्यामुळे त्यांचा शपथविधी होईपर्यंत पन्नीरसेल्वमच मुख्यमंत्री राहतील, हे स्पष्ट झालं होतं. मात्र पन्नीरसेल्वम अम्मांच्या समाधीस्थळी जाऊन ध्यानमग्न झाल्यानंतर तामिळनाडूच्या राजकारणाचा पारा एकदमच चढला होता.

अपोलो रुग्णालयात अम्मांवर उपचार चालू होते, त्याचवेळी कार्यकर्त्यांनी मला मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळण्यास सांगितलं होतं. इच्छा नसतानाही पक्षासाठी मुख्यमंत्री झालो. मात्र शपथविधी झाल्यानंतर 2 ते 3 दिवसातच शशिकला यांच्या पुतण्याने शशिकला पक्षाच्या महासचिव व्हाव्यात, अशी इच्छा बोलून दाखवली होती, असा खुलासाही पन्नीरसेल्वम यांनी केला.

जयललिता यांच्या मृत्यूनंतर ओ. पन्नीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली होती. अनेक राजकीय घडामोडींनंतर जयललितांच्या निकटवर्तीय शशिकला नटराजन यांच्यासाठी पन्नीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडली.

आपण मुख्यमंत्री व्हावं, अशी पन्नीरसेल्वम यांचीच इच्छा होती, असा दावा शशिकला यांनी केला होता. मात्र आता पन्नीरसेल्वम यांच्या खुलाशाने एकच खळबळ माजली आहे.

संबंधित बातम्या :


शशिकला नटराजन तामिळनाडूच्या नव्या मुख्यमंत्री


जयललितांच्या खुर्चीवर न बसणारा मुख्यमंत्री – ओ पन्नीरसेल्वम!


जयललितांच्या सावलीसारखी वावरणारी शशिकला कोण?


जयललिता यांच्यानंतर AIADMK ची धुरा शशिकला यांच्याकडे?