हैदराबादच्या एनआयएच्या विशेष कोर्टात असीमानंद यांची आज सकाळी सुनावणी होती. तब्बल 11 वर्षांनंतर असीमानंद यांना निर्दोष मुक्त करण्यात आलं. निकाल सुनावल्यानंतर रेड्डी यांनी तातडीने राजीनामा दिला.
18 मे 2007 रोजी हैदराबादमधल्या मक्का मशिदमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला होता, तर 58 जण जखमी झाले होते. स्थानिक पोलिसांच्या तपासानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. त्यानंतर 2011 मध्ये या प्रकरणाचा तपास एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे देण्यात आला. एनआयएला पुरावे गोळा करण्यात अपयश आल्याचं कारण देत असीमानंद यांची सुटका करण्यात आली.
दहा आरोपी
या स्फोटाप्रकरणी सीबीआयने एक आरोपपत्र दाखल केलं होतं. या स्फोटप्रकरणी स्वामी असीमानंदसह 10 जणांवर आरोप होता. यातील एका आरोपीचा मृत्यू झाला आहे.
कोण कोण आरोपी?
1. स्वामी असीमानंद
2. देवेंद्र गुप्ता
3. लोकेश शर्मा (अजय तिवारी)
4. लक्ष्मण दास महाराज
5. मोहनलाल रातेश्वर
6. राजेंद्र चौधरी
7. भारत मोहनलाल रातेश्वर
8. रामचंद्र कलसांगरा (फरार)
9. संदीप डांगे (फरार)
10. सुनील जोशी (मृत)
स्वामी असीमानंद यांचा कबुलीनामा
स्वामी असीमानंद यांनी 2011 मध्ये सत्र न्यायालयात दिलेल्या जबाबात, अजमेर दर्गा, हैदराबादची मक्का मशिद आणि अन्य ठिकाणी बॉम्बस्फोट केल्याची कबुली दिली होती. मात्र काही दिवसातच त्यांनी आपला जबाब फिरवला होता. त्यावेळी त्यांनी एनआयएने जबरदस्तीने आपल्याकडून हवं तसं वदवून घेतल्याचा दावा केला होता.
असीमानंदांवर आरोप
असीमानंदांवर 2006 आणि 2008 मध्ये ‘समझोता एक्स्प्रेस’ स्फोट (फेब्रुवारी 2007), हैदराबाद मक्का मस्जिद स्फोट (मे 2007), अजमेर दर्गा (ऑक्टोबर 2007) आणि मालेगांवमधील दोन स्फोट (सप्टेंबर 2006 आणि सप्टेंबर 2008) या स्फोटांचे आरोप होते. या सर्व स्फोटांमध्ये सुमारे 119 लोकांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या वर्षी असीमानंद यांना अजमेर दर्गा स्फोटप्रकरणी निर्दोष ठरवण्यात आलं होतं.
कोण आहेत असीमानंद?
असीमानंदांनी आपलं तारुण्य संघाच्या आदिवासी कल्याण आश्रममध्ये घालवलं. स्फोटाचा कट रचल्याचा आरोप ज्या कालावधीत होता, त्यावेळी ते आदिवासी कल्याण आश्रमाचे, धार्मिक विंग जागरण विभागाचे राष्ट्रीय प्रमुख होते. त्यांच्यासाठी हे पद खास तयार करण्यात आलं.
2005 मध्ये एम एस गोलवलकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त असीमानंद यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. असीमानंदांना विशेष गुरुजी सन्मान देण्यात आला. या सन्मानासोबत त्यांना एक लाख रुपये देण्यात आले. या गौरव सोहळ्यात भाजपचे माजी अध्यक्ष मुरली मनोहर जोशी यांनी व्याख्यान दिलं.
मात्र असीमानंदांवर आरोप होऊनही त्यांना दिलेला सन्मान, ना संघाने ना भाजपने, परत घेतला.