हैदराबाद : हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष एमआयएमने कर्नाटक विधानसभा निवडणुकीत जेडीएसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. जेडीएस हा माजी पंतप्रधान एचडी देवगौडा यांचा पक्ष आहे. कर्नाटकमध्ये 12 मे रोजी विधानसभा निवडणूक होणारआहे.


कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत असली तरी यावेळी एमआयएमची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. सुरुवातीला एमआयएमने स्वत:चे उमेदवार रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला होता. पण आता त्यांनी आपला पाठिंबा जेडीएसला दिला आहे.

याबाबत बोलताना ओवेसी म्हणाले की, 'जेडीएसचे सर्वाधिक उमेवाद निवडून यावेत यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत. देवेगौडा यांच्या पक्षाचं सरकार आणि कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्री होणं हेच आमचं लक्ष्य असणार आहे. काँग्रेस आणि भाजपने लोकांच्या आकांक्षा पूर्ण केलेल्या नाहीत त्यामुळे आम्ही जेडीएसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असून एमआयएम निवडणूक लढवणार नाही'

ओवेसी यांनी सुरुवातीलाच कुमारस्वामी यांच्याशी बातचीत केली असून त्यांनी आपला पाठिंबा जेडीएसला देण्याचं मान्यही केलं होतं.

दरम्यान, कर्नाटकमध्ये 12 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, भाजप आणि जेडीएस यांच्यात मोठी चुरस असणार आहे. निवडणुकांचे निकाल 15 मे रोजी जाहीर होतील.