जयपूर : 1999मधील कारगील युद्धात ब्रह्मास्त्र ठरलेल्या 'मिग-27'ने हिंदुस्थानच्या हवाई दलात जवळपास चार दशकांहून अधिक काळ पराक्रम गाजवला आहे. पण अखेर 'मिग-27' लढाऊ विमानं निवृत्त होणार असून जोधपूर एअरबेसवर शुक्रवारी त्यांना अखेरचा निरोप देण्यात येणार आहे. त्यामुळे 'मिग-27' श्रेणीतील सात लढाऊ विमानांचा प्रवास शुक्रवारी संपुष्टात येणार आहे. यावेळी या श्रेणीतील सातही विमानांचे शेवटच उड्डाण केले जाईल.
'मिग-27' विमानांना निरोप देण्यासाठी हवाई दलाच्या सूर्यकिरण विमानांची टीम जोधपूर एअरबेसवर पोहोचली आहे. सूर्यकिरण विमानांच्या थरारक प्रात्यक्षिकांनी 'मिग-27' विमानांचा सन्मान केला जाणार आहे. 'मिग-27' श्रेणीतील सातही विमानांचे उड्डाण झाल्यानंतर हवाई दलाकडून या विमानांना सॅल्यूट केला जाईल.
'मिग-27' श्रेणीतील विमानांचा इतर कोणताही देश वापर करत नाही. फक्त भारतात ही लढाऊ विमानं वापरली जात होती. 'मिग-27' हे भारतीय हवाई दलातील लढाऊ विमान हवेतून जमिनीवर मारा करणारे सर्वोत्तम विमान आहे. संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी याबाबत माहिती देताना सांगितले की, कारगिल युद्धादरम्यान 'मिग-27' भारतासाठी ब्रम्हास्त्र ठरलं होतं. त्यावेळी 'मिग-27'ने शुत्रूची अनेक ठिकाणं उध्वस्थ केली होती.' एवढचं नाहीतर अनेक प्रुमख ऑपरेशन्समध्येही 'मिग-27'ने महत्त्वाची भूमिका बजावली होती.
दरम्यान, मिग-27 विमानांना निरोप देण्यासाठी जोधपूरमधील एअरबेसवर एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. भारतीय हवाई दलाने याबाबत ट्वीट केलं आहे. ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, भारतीय हवाई दलाचं ताकदवान 'मिग 27' निवृत्त होणार आहे. 27 डिसेंबर 2019 ला जोधपूर येथील एअरबेसवर होणाऱ्या खास सोहळ्यात या विमानांना निरोप देण्यात येईल.