G20 Summit 2023 in Delhi : भारत : अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) गुरुवारी (7 सप्टेंबर) जी-20 (G20) परिषदेसाठी भारतात येणार आहेत. यावेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याशी अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्याची देखील शक्यता आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे पहिल्यांच भारतात येणार आहेत. याआधी तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेब्रुवारी 2020 मध्ये भारताचा दौरा केला होता. सर्वसाधारणपणे जी-20 परिषदेदरम्यान दोन देशांमध्ये द्विपक्षीय बैठकीचे आयोजन केले जात नाही. परंतु, भारताने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याशी द्विपक्षीय बैठक करण्यास सहमती दर्शवली आहे. 


राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्या दौऱ्यापूर्वी भारत आणि अमेरिका द्विपक्षीय बैठकीशी संबंधित अनेक महत्त्वकांक्षी योजनांवर सध्या काम करत आहेत. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्या भारत दौऱ्यावेळी दोन्ही देश संभाव्य अणुकरारावर स्वाक्षरी करण्याची शक्यता आहे. याशिवाय ड्रोन डील आणि जेट इंजिनवरील संरक्षण करारासाठी अमेरिकन काँग्रेसच्या मंजुरीवरील प्रगतीवरही चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.  


अमेरिकन विझा संदर्भात देखील चर्चेची शक्यता 


या बैठकीदरम्यान दोन्ही देशांमध्ये युक्रेनला संयुक्त मदत करण्यावरही चर्चा करण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तसेच, अमेरिकेतील भारतीयांसाठी अधिक उदार व्हिसा देण्याची व्यवस्था करण्याचा भारताकडून प्रयत्न करण्यात येईल. तर दोन्ही देशांमध्ये नवीन वाणिज्य दूतावास स्थापन करण्यावरही चर्चा होण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे. इंडियन एक्सप्रेसला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जो बायडन यांच्या पहिल्या दौऱ्यासाठी योग्य संभाषण तयार करण्यासाठी भारत आणि अमेरिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होत आहे. 


जून महिन्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावेळी, दोन्ही देशांनी भारतात सहा अणुभट्ट्या तयार करण्याच्या मुद्द्यावर चर्चा केली. यावेळी त्यांनी न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) आणि वेस्टिंगहाऊस इलेक्ट्रिक कंपनी (WEC) यांच्यात देखील चर्चा केली. सध्या काही लहान मॉड्युलर रिअॅक्टर तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी चर्चा सुरु असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच, याच मुद्द्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. 


युक्रेनला करणार संयुक्त मदत?


भारताने आतापर्यंत युक्रेनला अनेक पद्धतीने मदत केली आहे. यामध्ये आवश्यक औषधे, वैद्यकीय उपकरणे, अन्न या अत्यावश्यक गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. सध्या युक्रेनला संयुक्त मदत करण्यावर भारत आणि अमेरिका मदत करणार आहेत. पण सध्या या चर्चांवर अद्याप कोणताही शिक्कामोर्तब करण्यात आलेला नाही. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


G20 Summit India: जी-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत लागणार लॉकडाऊन? दिल्ली पोलिसांचं हटके अंदाजात उत्तर