नवी दिल्ली : यूपीए सरकारच्या काळात गाजलेल्या कोळसा घोटाळाप्रकरणी झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांना दिल्लीच्या विशेष सीबीआय कोर्टानं आज (बुधवार) दोषी ठरवलं आहे. मधू कोडा यांच्याशिवाय माजी सचिव एच सी गुप्ता यांच्यासह एकूण चार जणांनाही दोषी ठरवण्यात आलं आहे. त्यांच्या शिक्षेबाबात उद्या (गुरुवार) कोर्टात युक्तीवाद होणार आहे.


अनियमित पद्धतीनं कोळसा खाणीच्या कंत्राटांचे वाटप करण्यात आल्याचा आरोप मधू कोडा आणि सचिव गुप्ता यांच्यावर करण्यात आले होते. या प्रकरणात इतरही बऱ्याच जणांचा समावेश आहे. यात एका चार्टर्ड अकाउंटेंटचाही समावेश आहे.


यूपीए सरकारच्या काळात जे घोटाळे गाजले होते. त्यापैकीच हा कोळसा घोटाळा आहे. अनियमित पद्धतीनं खाण वाटप करण्याचा आरोप सिद्ध झाल्यानं मधू कोडा यांच्यासह सर्व आरोपींना कट रचणं आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आलं.

या घोटाळ्याची राजकीय वर्तुळात आणि देशभरात बरीच चर्चा झाली होती. यूपीए सरकार जाण्यामागे हे देखील एक कारण असल्याचं अनेकांचं मत आहे.

दरम्यान, आता मधू कोडा यांना नेमकी काय शिक्षा सुनावली जाणार याकडेच सगळ्यांचे लक्ष लागून राहिलं आहे.