नवी दिल्ली : आयएफएस अधिकारी हर्षवर्धन शृंगला यांची देशाचे नवे परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ते अमेरिकेत भारताचे राजदूत म्हणून काम पाहात आहेत. केंद्र सरकारने सोमवारी एक आदेश जारी करत शृंगला यांच्या नियुक्तीची घोषणा केली. शृंगला 1984 च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस) अधिकारी आहेत.


हर्षवर्धन शृंगला 29 जानेवारी 2020 पासून परराष्ट्र सचिव पदाचा पदभार सांभाळणार आहेत. सध्याचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विजय गोखले यांचा कार्यकाळ 28 जानेवारीला समाप्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटने शृंगला यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे.





शृंगला यांनी दिल्लीतील सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. आयएफएस अधिकारी बनण्याआधी त्यांनी खासगी क्षेत्रातही नोकरी केली होती. आपल्या 35 वर्षांच्या कार्यकाळात शृंगला यांनी अनेक महत्त्वांच्या पदावर काम केलं आहे.  अमेरिकेत भारताचे राजदूत म्हणून रुजू होण्याआधी हर्षवर्धन शृंगला बांगलादेश आणि थायलंडमध्ये भारताचे राजदूत होते. व्हिएतनाम, इस्राईल आणि दक्षिण आफ्रिका या देशांमध्येही सरकारने त्यांची महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती केली होती.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिकेतील 'हाऊडी मोदी' कार्यक्रम यावर्षी पार पडला होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यामागे शृंगला यांचा मोठा वाटा होता. अमेरिकेतील 50 हजार भारतीयांशी संवाद साधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या कार्यक्रमातद एकत्र आले होते.