Hemant Soren : झारखंडच्या विधानसभेत (Jharkhand Assembly) मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांच्या नेतृत्वातील सरकारने विधानसभेत विश्वासदर्शक ठराव (Confidence Motion) जिंकला आहे. झारखंड विधानसभेतील 81 सदस्यांपैकी हेमंत सोरेन यांच्या बाजूने 48 मते पडली. सभागृहात विश्वासमत ठरावाच्यावेळी भाजपने सभात्याग केला. 


विधानसभेत आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव मंजूर झाला. हेमंत सोरेन यांच्याबाजूने 48 मते पडली. तर, विरोधात एकही मत पडले नाही. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी सरकारने विश्वासमत जिंकला असल्याचे जाहीर केले. त्यानंतर विधानसभेचे कार्यवाही अनिश्चितकाळासाठी स्थगित केली. 


विश्वासमत ठरावावेळी बोलताना मुख्यमंत्री सोरेन यांनी म्हटले की, विरोधकांनी लोकशाही नष्ट केली आहे. भाजपने आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न केला. आज आम्ही विधानसभेत आपली ताकद दाखवणार असल्याचे त्यांनी म्हटले. विधानसभेचे हे अधिवेशन लोकशाही वाचवण्यासाठी बोलवण्यात आले आहे. सामान्य लोकं वस्तू खरेदी करतात. मात्र, भाजप आमदारांनाच खरेदी करतात. भाजपने सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप सोरेन यांनी केला. 


भाजपकडून बोलताना नीलकंठ मुंडा यांनी म्हटले की, झारखंडचे नागरीक घाबरले आहेत. विरोधकांनी, कोर्टाने अथवा राज्यपालांनी विश्वासमत सिद्ध करण्यास सांगितले नाही. तरीदेखील सरकार का घाबरले असा सवाल त्यांनी केला. विश्वासमत ठराव अशा पद्धतीने आणणे म्हणजे सरकारला आपल्याच आमदारांवर विश्वास नाही, असे दिसत आहे.


विश्वासमत ठरावाच्या भाषणाच्या वेळी काही आमदारांनी सभागृहात आंदोलन केले. सभागृहात पलामूमध्ये महादलित समुदायातील व्यक्तीचे घर उद्धवस्त करणे आणि दुमकातील अंकिताच्या हत्याकांडाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. 


मुख्यमंत्री हेमंत सोरेन सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. एका खाणीचा पट्टा स्वत: मुख्यमंत्री असताना स्वत: च्या नावावर केला असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने सोरेन यांची आमदारकी रद्द करण्याची शिफारस राज्यपालांना केली आहे. मात्र, राज्यपालांनी यावर अधिकृतपणे कोणताही निर्णय जाहीर केला नाही. सरकारवरील संकट टाळण्यासाठी सोरेन यांनी आपल्या झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसच्या आमदारांसह छत्तीसगडची राजधानी रायपूर गाठली होती. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: