मुंबई : जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल आणि त्यांची पत्नी अनिता यांना देशाबाहेर जाण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. गृहमंत्रालयाच्या लुकआउट नोटिस मुळे देशाबाहेर जाण्याची परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती शनिवारी मुंबई विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यांना दिली.


नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नी परदेशात जाण्यासाठी मुंबई विमानतळावर आलेले असताना त्यांना इमिग्रेशन अधिकाऱ्यांकडून अडवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावेळी अनिता गोयल यांच्या नावे असलेल्या बॅग्ज देखील विमानातून बाहेर काढून घेण्यात आल्या. या सगळ्या प्रकारामुळे विमानाच्या उड्डाणालाही उशीर झाला.

काही दिवसांपूर्वी बँकांकडून 400 कोटींची मदत न मिळाल्याने जेट एअरवेजची सेवा पूर्णपणे बंद करण्याच्या निर्णय घेण्यात आला होता. यामुळे हजारो कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. त्यानंतर जेट एअरवेजच्या अधिकारी आणि कामगारांच्या संघटनेने मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून नरेश गोयल यांचा पासपोर्ट जप्त करण्याची मागणी केली होती.

जेट एअरवेजच्या आर्थिक अडचणी वाढल्यानंतर 25 मार्च रोजी संस्थापक नरेश गोयल यांनी आपल्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता. काही दिवसांपूर्वीच जेटची आंतरराष्ट्रीय विमानसेवा देखील बंद करण्यात आली होती. जेट एअरवेज बंद पडल्यानं 20 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आली आहे.