मुंबई : अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत बदल करण्याचा विचार केंद्र सरकारचा विचार आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी देशभरात सर्वांसाठी नीट प्रवेश परिक्षा सक्तीची केल्यानंतर आता अभियांत्रिकी प्रवेशासाठीही जेईई म्हणजेच जॉईंट एंट्रंन्स एक्झाम सक्तीची करण्यासाठी केंद्र सरकारने पावलं उचलली आहेत.
वैद्यकीय आणि दंतचिकित्सा अभ्यासक्रमांसाठी नीट ही केंद्रीय परिक्षा घेण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला होता. त्याच धर्तीवर आता अभियांत्रिकीचे प्रवेशही जेईईच्या माध्यमातून होण्याची शक्यता आहे. ही प्रवेशप्रक्रिया देशभरातील सर्व विद्यापीठांसाठी सक्तीची केली जाण्याचीही शक्यता आहे.
अभियांत्रिकी प्रवेशासाठी होणारा काळाबाजार रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून यासंबंधी विचार सुरु आहे. त्यामुळे राज्यातील सीईटी रद्द होऊन फक्त जेईई ही केंद्रीय परिक्षा विद्यार्थ्यांना द्यावी लागेल. सध्या देशभरातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयात 100 हून अधिक प्रवेश परिक्षा घेतल्या जातात. जेईई लागू झाल्यानंतर देशातील जवळपास 4000 अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
महाराष्ट्रात सध्या एमएच-सीईटीच्या माध्यमातून वैद्यकीय आणि अभियांत्रिकीचे प्रवेश दिले जातात. आता ही सीईटी रद्द होऊन नीट आणि जेईईच्या माध्यमातून प्रवेशप्रक्रिया राबवली जाईल.