नवी दिल्ली : शत्रूचा नायनाट करणं अशक्य असल्यास, त्याला आपल्या गटात सामील करा, असं म्हटलं जातं. याच वाक्प्रचाराला अनुसरुन एनडीएने उत्तरेनंतर आता दक्षिणेकडेही कूच केलं आहे. तामिळनाडूतील जयललिता यांचा अण्णाद्रमुक पक्ष भाजपप्रणित एनडीएमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.


AIADMK एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अण्णाद्रमुकचे लोकसभेत 37, तर राज्यसभेत 13 खासदार आहेत. खासदारांच्या संख्याबळानुसार भाजप आणि काँग्रेसनंतर एआयएडीएमके तिसऱ्या क्रमांकावर आहे.

तामिळनाडूमध्ये अण्णाद्रमुकने दुसऱ्यांदा सत्ता स्थापन केली आहे. राज्यातील विधानसभेच्या 234 जागांपैकी 130 जागा 'एआयएडीएमके'कडे आहेत. बिहारमधील जेडीयू नंतर एआयएडीएमकेही एनडीएमध्ये सामील झाल्यास राज्यसभेवर सरकारला मोठा फायदा होऊ शकतो.

राष्ट्रपती निवडणुकीत रामनाथ कोविंद यांना अण्णाद्रमुकने पाठिंबा दिला होता. त्याचवेळी हा पक्ष एनडीएमध्ये सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

देशात भाजपची सत्ता कुठे कुठे?

महाराष्ट्र
उत्तर प्रदेश
मध्य प्रदेश
राजस्थान
गुजरात
झारखंड
आसाम
छत्तीसगड
हरियाणा
उत्तराखंड
गोवा

भाजपची युती कुठे कुठे?

आंध्र प्रदेश
जम्मू काश्मिर
अरुणाचल प्रदेश
बिहार