जयललितांना सहाव्यांदा तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
एबीपी माझा वेब टीम | 23 May 2016 02:34 AM (IST)
चेन्नई : तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या जयललिता आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. जयललिता या सहाव्यांदा मुख्यमंत्रिपद भूषवणार असून सहाव्यांदा या पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्याच महिला मुख्यमंत्री आहेत. मद्रास विद्यापीठाच्या प्रांगणात राज्यपाल डॉ. के. रोसैया जयललिता यांना मुख्यमंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ देणार आहेत. यावेळी 'अम्मां'सोबत त्यांच्या 28 कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी होईल. यावेळी कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात येणार असून काही केंद्रीय मंत्री, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि इतर पक्षांचे मोठे नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. जयललिता यांच्या अण्णाद्रमुक पक्षाने 232 पैकी 134 जागांवर विजय मिळवला होता. तामिळनाडूत यापूर्वी सलग दोनवेळा कोणत्याही सरकारने सत्ता स्थापन केली नव्हती. मात्र जयललितांनी हा इतिहास बदलला आहे.