Jaya Bachchan in Rajya Sabha : एकीकडे पनामा पेपर्सप्रकरणी अभिनेत्री ऐश्वर्या रायची चौकशी सुरु असताना तिकडे राज्यसभेत समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन सत्ताधारी भाजपवर चांगल्याच संतापल्या. तुमचे वाईट दिवस लवकरच सुरु होणार आहेत. असा शाप मी देते,  असं जया बच्चन सत्ताधाऱ्यांना उद्देशून म्हणाल्या. 12 खासदारांच्या निलंबनावरुन जरी जया बच्चन यांचा असा संताप झाला असला. तरी त्यांच्या संतापामागे ऐश्वर्या रायच्या सुरु असलेल्या चौकशीचं कारण नाकारता येणार नाही..


समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन यांनी राज्यसभेत बोलताना सत्ताधारी भाजपवर टीकास्त्र सोडलं. माझ्यावर वैयक्तीक टिपण्णी केली.  माझा तुम्हाला शाप आहे, तुमचे लवकरच वाईट दिवस येणार आहेत. तुम्ही आमचा जीवच घ्या. तुम्ही काय करताय? कुणापुढे पुंगी वाजवत आहात?, असं वक्तव्य जया बच्चन यांनी राज्यसभेतील आपल्या युक्तीवादादरम्यान केलं आहे. 


जया बच्चन यांच्या युक्तीवादानंतर राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक झाली.  अध्यक्षस्थानी असलेल्या भुवनेश्वर कलिता यांनी काही वेळासाठी राज्यसभा स्थगित करण्याचा निर्णय घेतला.  12 खासदारांचं निलंबन मागे घ्या आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची सोमवारी राज्यसभेत विरोधकांनी मागणी केली होती. यासाठी गदारोळ झाला. सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाले होते. सकाळपासून याच मुद्द्यावर विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आले होते. जोपर्यंत माफी मागितली जात नाही, तोपर्यंत निलंबन माघे घेतलं जाणार नाही, अशी भूमिका सत्ताधारी भाजपने घेतली आहे. 


राज्यसभेतील 12 खासदार निलंबित - 
ऑगस्ट महिन्यात झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अभूतपूर्व गोंधळ झाला होता. कृषी कायदे, कोरोना परिस्थिती हाताळण्यात आलेले सरकारला अपयश यावरून पावसाळी अधिवेशन वादळी होणार अशी अटकळ बांधली जात होती. राज्यसभेत 11 ऑगस्ट रोजी मार्शल बोलवण्यात आले होते. एका विधेयकाच्या चर्चेदरम्यान हा गोंधळ झाला. यावेळी सुरक्षा रक्षक आणि खासदारांमध्ये वादावादीही झाली होती. या गोंधळाप्रकरणी राज्यसभेतील 12 खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. 


निलंबित खासदारांची यादी -
प्रियांका चतुर्वेदी (शिवसेना), अनिल देसाई (शिवसेना), इलामाराम करीम (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष), फुलो देवी नेताम (काँग्रेस), छाया वर्मा (काँग्रेस), रिपुन बोरा (काँग्रेस), बिनॉय विश्वम (भारतीय कम्युनिस्ट पक्ष), राजमणी पटेल (काँग्रेस), डोला सेन (काँग्रेस), शांता छेत्री (काँग्रेस), सय्यद नासिर हुसेन (काँग्रेस), अखिलेश प्रसाद सिंग (काँग्रेस)