नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन भारतीय सैन्याने दहशतवाद्यांविरोधात सर्जिकल स्ट्राईक केलं. त्यानंतर पाकिस्तानमधील राजकीय नेते, कलाकार मंडळी आणि आता क्रिकेटरही भारताविरोधात गरळ ओकू लागले आहेत. त्यात माजी क्रिकेट जावेद मियाँदादचाही समावेश आहे.
पाकिस्तानचा माजी क्रेकेटर जावेद मियाँदाद याच्या मते, पाकिस्तानने भारताविरोधात युद्ध करायला हवं. शिवाय, भारताविरोधात युद्ध करण्यास पाकिस्तान पूर्णपणे तयार असल्याचंही मियाँदादने म्हटलं होतं.
जावेद मियाँदादच्या या विधानाचा बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी खरपूस समाचार घेतला. अनुराग ठाकूर म्हणाले, "पाकिस्तानचा हा माजी क्रिकेटर क्रिकेटच्या मैदानातील त्याच्या देशाच्या परभावाच्या रेकॉर्ड्समुळे अजूनही धक्क्यातच आहे."
अनुराग ठाकूर म्हाणाले, "पाकिस्तान आतापर्यंत 1965, 1971 आणि कारगिल युद्धावेळी भारताने दिलेल्या धक्क्यातून सावरला नाही. इतिहासात आतापर्यंत पाकिस्तान भारताविरोधात जिंकला नाही. आता गरज पडल्यास भारत पुन्हा एकदा पाकिस्तानला धूळ चारण्यास तयार आहे, मग ते युद्धाच्या रणांगणात असो वा क्रिकेटच्या मैदानात."