टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर जसप्रीत बुमरा चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान चर्चेत राहतो. त्याने टी-20 च्या आयसीसी रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे, मात्र त्याचे आजोबा हालाखीच्या परिस्थितीत जगत आहेत. उत्तराखंडच्या उधमसिंहनगरमध्ये राहणारे जसप्रीत सिंह बुमराचे आजोबा रिक्षा-टेम्पो चालवून पोट भरत आहेत.
लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या जसप्रीत बुमराच्या आजोबांना नातवाची कामगिरी मैदानावर पाहता येत नसल्याची खंत आहे. एका सामान्य क्रिकेट चाहत्याप्रमाणे त्यांनीही नातवाला केवळ टीव्हीवरच खेळताना पाहिलं आहे. उधमसिंहनगरच्या किच्छामध्ये राहणारे जसप्रीत बुमराचे आजोबा संतोष सिंह यांच्यासोबत नशिबाने असा खेळ खेळला की, त्यांच्यावर रिक्षा-टेम्पो चालवण्याची नामुष्की ओढावली आहे.
कुटुंबाची फरफट
84 वर्षीय संतोष सिंह बुमरा किच्छामध्ये आपल्या एका दिव्यांग मुलासह भाड्याच्या घरात राहतात. पण बुमराच्या आजोबांवर ही परिस्थिती का ओढावली, यासाठी आपल्याला 15 वर्ष मागे जावं लागेल. हे कुटुंब अगदी आलिशान आयुष्य जगत होतं. संतोष सिंह बुमरा यांचा मुलगा आणि जसप्रीत बुमराचे वडील जसवीर बुमरा यांचे गुजरातमधील अहमदाबादमध्ये तीन कारखाने होते. पण 2001 मध्ये जसप्रीत बुमराच्या वडिलांचं निधन झालं. यानंतर कुटुंबाची फरफट सुरु झाली.
मुलाच्या निधनानंतर त्यांचं कुटुंब आर्थिक संकटात सापडलं. बँकांचं कर्ज फेडण्यासाठी तिन्ही कारखाने विकावे लागले. त्यानंतर बुमरा कुटुंब उत्तराखंडमध्ये गेलं. यादरम्यान काही कारणांमुळे जसप्रीत बुमराची आई आणि जसप्रीत आजोबांपासून वेगळे राहू लागले.
पोलिसांनी टेम्पो पकडल्यानंतर रहस्याचा उलगडा
संतोख सिंह बुमरा यांच्या उदरनिर्वाहाचं एकमेव साधन असलेला टेम्पोची पावती नुकतीच पोलिसांनी फाडली होती. तो सोडवून आणण्यासाठी त्यांनी अनेक दिवस सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारल्या. यावेळी काही त्यांच्या काही परिचितांनी त्यांच्याबाबत माहिती दिली. इतकंच नाही तर संतोख यांनी जसप्रीत बुमराचे आजोबा असल्याचे अनेक पुरावेही मीडियासमोर सादर केले.
बुमराकडून मदतीची अपेक्षा नाही
आपल्या नातवाला छातीशी कवटाळण्याची जसप्रीतच्या आजोबांची इच्छा आहे की. यासाठी ते जसप्रीत बुमराच्या येण्याची वाट पाहत आहेत. यशाच्या शिखरावर पोहोचलेला नातू कधी ना कधी विचारपूर करेलच, अशी अपेक्षा बुमराच्या आजोबांनी व्यक्त केली.
क्रिकेटर जसप्रीत बुमराच्या आजोबांनी स्पष्ट सांगितलं की, त्यांना नातवाकडून एका पैशाच्या मदतीची अपेक्षा नाही. माझा नातू आज मोठा खेळाडू आहे, याचा मला अभिमान आहे. त्याला फक्त एकदा मिठी मारुन आशीर्वाद द्यायचा आहे, अशी त्यांची इच्छा आहे.
बुमरा, आताच्या घडीला भारतीय क्रिकेटचा चमकता तारा आहे. त्याने 16 वन डे सामन्यांमध्ये 26 विकेट्स घेतल्या होत्या. तर टी-20 मध्ये बुमराने एकूण 33 विकेट्स आपल्या नावावर जमा केल्या आहेत. आयपीएलमध्ये बुमरा मुंबई इंडियन्स टीमचा स्टार पेसर आहे.