अहमदाबाद : जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचं अहमदाबादमध्ये जोरदार स्वागत झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी शिंजो आबे यांच्या स्वागतासाठी स्वत: अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर हजर होते.

शिंजो आबे यांना विमानतळावर गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांकडून जपानचे पंतप्रधान आणि त्यांच्या पत्नीचं पारंपरिक नृत्य सादर करत स्वागत झालं.

अहमदाबादेत रोड शो


दरम्यान, अहमदाबादमध्ये दाखल झाल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि शिंजो आबे यांच्या रोड शोला सुरुवात झाली. विशेष म्हणजे या रोड शोदरम्यान आबे आणि त्यांच्या पत्नी भारतीय वेशभूषेत दिसले. आठ किमीच्या रोड शोदरम्यान जपानच्या पंतप्रधानांना भारतीय संस्कृतीची विविधता दाखवण्यात आली. या रोड शोदरम्यान तगडी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.

https://twitter.com/ANI/status/907923021582680064



या रोड शोचा शेवट साबरमती आश्रमाजवळ झाला. यानंतर नरेंद्र मोदी, शिंजो आबे आणि त्यांच्या पत्नी अकई आबे यांनी महात्मा गांधींना आदरांजली वाहिली

बुलेट ट्रेनचं भूमीपूजन
खरंतर शिंजो आबे यापूर्वीही भारतात आले आहेत. पण यावेळी त्यांचा दौरा भारतासाठी खास आहे. या दौऱ्यात शिंजो आबे भारताला बुलेट ट्रेनची भेट देणार आहेत.

आपल्या दोन दिवसाच्या दौऱ्यात शिंजो आबे गुजरातमध्येच राहणार आहेत. मोदी आणि आबे यांच्या हस्ते उद्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा भूमीपूजन करण्यात येणार आहे.

शिंजो आबे यांचा भारत दौरा

बुधवार, 13 सप्टेंबर 2017

दुपारी 3.30 वा – अहमदाबादेतील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर आगमन

दुपारी 4.30 वा – साबरमती आश्रमाला भेट

संध्या. 6.15 वा. – सिदी सैय्यद मशिदीला भेट

गुरुवार 14 सप्टेंबर 2017

सकाळी 9.50 वा. – भारतातील पहिली बुलेट ट्रेन अहमदाबाद-मुंबईचं भूमीपूजन

सकाळी 11.30 वा.  – दांडी कुतीरला भेट

दुपारी 12 वा. – उच्चस्तरीय चर्चा

दुपारी 1. वा – दोन्ही देशात करार आणि पत्रकार परिषद, स्थळ- महात्मा मंदिर

दुपारी 2.30 वा - भारत-जपान बिझनेस लिडर ग्रुप फोटो

दुपारी 3.45 वा – महात्मा मंदिरातील कॉन्व्हेंन्शन हॉलमधील प्रदर्शन पाहणी

रात्री 9.35 वा. – शिंजो आबे टोकियोला रवाना होणार