नवी दिल्ली : ‘नारायण राणेंनी काँग्रेसमध्ये येताना जितके कार्यकर्ते आणले त्यापेक्षा जास्त निष्ठावंत कोकणात आहेत.’ अशा शब्दात खासदार हुसेन दलवाईंनी राणेंवर तोफ डागली आहे. काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गात झालेल्या काँग्रेस बैठकींवरुन दलवाई, राणेंमध्ये वादाची नवी ठिगणी पडली आहे.


हुसेन दलवाई कोण?, त्यांचा सिंधुदुर्गाशी काय संबंध? या राणेंच्या टीकेला हुसेन दलवाईंनी उत्तर दिलं आहे. राणे भाजपमध्ये जाणार की नाही याबद्दल संभ्रम कायम आहे. त्याचाच परिणाम  सिंधुदुर्गातील काँग्रेसच्या बैठकीत पाहायला मिळाला.

'मी सिंधुदुर्गचा जावई आहे, पालकमंत्री राहिलेलो आहे. राणे काँग्रेसमध्ये येताना जितके कार्यकर्ते घेऊन आले, त्यापेक्षा जास्त काँग्रेसचे निष्ठावंत कोकणात आहेत.' अशा शब्दात दलवाईंनी राणेंवर निशाणा साधला.

एकाच जिल्ह्यात एकाच पक्षाच्या दोन स्वतंत्र बैठका घेण्याची वेळ आली. त्यानंतर एकमेकांवर आरोपांच्या फैरीही झडल्या.

दरम्यान, यावेळी राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर देखील दलवाई यांनी प्रतिक्रिया दिली. ‘राणे भाजपमध्ये जाणार असतील तर आमच्या शुभेच्छा आहेत. पण भाजपमध्ये त्यांना सन्मान मिळेल असं वाटत नाही. ईडीची भीती दाखवली जाते, तुमचा भुजबळ करु अशी धमकी दाखवली जाते. अर्थात राणेसाहेब असल्या धमक्यांना घाबरणार नाहीत.’ असा टोलाही दलवाई यांनी हाणला.

VIDEO :