Jammu Kashmir News : जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराला (Jammu Kashmir Encounter) मोठं यश आलं आहे. सैन्य दलाने पाच दहशतवाद्यांना (Terrorist Encounter) कंठस्नान घातलं आहे. जम्मू-काश्मीरमधील कुलगाम सेक्टरमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली, यात भारतीय लष्कराला मोठं यश मिळालं आहे. सैन्य दलाने लष्कर-ए-तोएबाच्या पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात मोहिम हाती घेतली आहे, यामध्ये पोलिसांच्या मदतीने सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोएबाचे पाच दहशतवादी ठार झाले आहेत. कुलगाम पोलिसांनी शुक्रवारी, 17 नोव्हेंबरला या संदर्भात माहिती दिली आहे. यावेळी पोलिसांनी सांगितलं की, कुलगाम पोलिसांनी लष्कराच्या मदतीने ही कारवाई केली आहे.
लष्कर-ए-तोएबाचे पाच दहशतवादी ठार
कुलगाम पोलिसांनी सांगितलं की, कुलगामच्या नेहामा गावात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी गावाला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली. यावेळी दहशतवाद्यांनी सैन्य दलावर गोळीबार केला, ज्यामध्ये पाच दहशतवादी मारले गेले आहेत. समीर अहमद शेख, यासिर बिलाल भट, दानिश अहमद ठोकर, हंजुल्ला याकुब शाह आणि उबेद अहमद पदर ही मृत दहशतवाद्यांची नावे आहेत.
शस्त्रे आणि दारूगोळा जप्त
पोलिसांनी पुढे सांगितलं की, मारले गेलेले दहशतवादी नागरिकांवरील अत्याचारांसह अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सामील असल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवाद्यांकडून चार एके-रायफल, चार ग्रेनेड आणि दोन पिस्तुलांसह आक्षेपार्ह साहित्य, शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
दहशतवादी लपले असल्याच सुत्रांकडून माहिती
या कारवाईबाबत दक्षिण काश्मीर विभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक (DIG) रईस भट यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितलं की, "दहशतवादी लपले असल्याची गोपनीय सुत्रांकजून माहिती मिळाल्यानंतर, जम्मू-काश्मीर पोलीस, भारतीय लष्कराच्या 34 राष्ट्रीय रायफल्स, सीआरपीएफच्या 18व्या रायफल डिव्हिजन आणि बटालियनने सामनो येथे संयुक्त कारवाई सुरू केली. एका घरात लपून बसलेल्या लष्कराच्या दहशतवाद्यांशी संपर्क झाला होता. त्यानंतर सैन्य दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत पाच दहशतवादी मारले गेले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Jammu Kashmir Accident : जम्मू-काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना! 250 मीटर खोल दरीत कोसळली बस, 36 जणांचा मृत्यू