जम्मू : पाकिस्तानी रेंजर्सने बीएसएफ जवानाची निर्घृण हत्या केल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी भ्याड कृत्य केलं आहे. भारतीय सैन्य आणि पोलिसांच्या कारवाईमुळे चवताळलेल्या दहशतवाद्यांनी शुक्रवारी पहाटे शोपियां जिल्ह्यातून तीन पोलिसांचं अपहरण करुन त्यांची हत्या केली.
शोध मोहीमेदरम्यान कापरन गावात गोळ्यांनी चाळण झालेले पोलिसांचे मृतदेह सापडले. सूत्रांच्या माहितीनुसार, स्थानिक दहशतवाद्यांनी या पोलिसांचं अपहरण केलं होतं, ज्यात दोन स्पेशल पोलिस अधिकारी (एसपीओ) आणि एका पोलिस कर्मचाऱ्याचा समावेश होता.
फिरदौस, कुलवंत सिंह आणि निसार अहमद अशी मृत पोलिसांची नावं आहे. महत्त्वाचं म्हणजे हे क्रूरकृत्य करण्याआधी दहशतवाद्यांनी पोलिसांना नोकरी सोडा अन्यथा परिणामांना सामोरं जा, अशी धमकी दिली होती. हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर रियाज नाइकू हा पोलिसांच्या हत्येमागचा मास्टरमाईंड असल्याचं कळतं.
नाइकूने 2 मिनिटांच्या एका व्हिडीओद्वारे अपहरणाची जबाबदारी स्वीकारली होती. या व्हिडीओमध्ये त्याने दहशतवाद्यांच्या सर्व कुटुंबीयांना सोडण्यासाठी तीन दिवसांची मुदत होती. तसंच काही दिवसांपूर्वी हिज्बुल मुजाहिद्दीनच्या अतिरेक्यांनी पोस्टर आणि व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे पोलिसांना राजीनामा द्या, अन्यथा परिणामांना तयार राहा, अशी धमकी दिली होती. शिवाय राजीनाम्याची कॉपी इंटरनेटवर अपलोड करावी, असंही अतिरेक्यांनी व्हिडीओमध्ये सांगितलं होतं. जम्मू-काश्मीरच्या अनेक गावांमध्ये याचे पोस्टर्स लावले होते.