गांधीनगर: गुजरातमधील गीर जंगलात गेल्या काही दिवसात 11 सिंहांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये 6 नर सिंह, 3 मादी सिंह आणि 2 नर बछड्यांचा समावेश आहे. मृत्यूमागचं नेमकं कारण काय, याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गीर अभयारण्याच्या पूर्व भागात 11 सिंहांचे मृतदेह आढळले.


या सर्व सिंहांचा मृत्यू हा नैसर्गिक असल्याची माहिती वनअधिकाऱ्यांनी दिली. मात्र यातील 4 सिंहांचा मृत्यू हा फुफ्फूस आणि यकृत संसर्गामुळे झाल्यानं वनाधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली. त्यामुळे मृत्यू झालेल्या सर्वच सिंहाचे शवविच्छेदन करुन अंतिम अहवाल आल्यानंतर सिंहांच्या मृत्यूचं कारण समजेल.

गुजरातमधील गीरचं जंगल हे एकमेव असं जंगल आहे जिथं आशिया खंडातून लुप्त होणाऱ्या सिंहांच्या प्रजातींचं संवर्धन केलं जातं.

सर्वात आधी बुधवारी एका सिंहाचा मृतदेह आढळला होता. मग त्याच दिवशी आणखी तीन सिंह मृतावस्थेत आढळले. त्यानंतर काही दिवसात एक-एक करत सात सिंहांचे शव मिळाले. वनअधिकाऱ्यांनी मृत सिंहांच्या व्हिसेराचे नमुने घेतले आहेत. ते नमुने जुनागढच्या पशूवैद्यकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. रुग्णालयाचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर सिंहांच्या मृत्यूचं कारण समोर येईल.

दरम्यान, 8 सिंहांचा मृत्यू हा परस्परांवरील हल्ल्यातून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर 3 सिंहांच्या मृत्यूचं कारण गुलदस्त्यात आहे. एकदंरीत सर्वच सिंहांच्या मृत्यूचं कारण शवविच्छेदन अहवालानंतरच येईल.