Jammu Kashmir Terrorist Killed : भारतीय सैन्य दलाच्या (Indian Army) जवानांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न (Infiltrators) पुन्हा एकदा उधळून लावला आहे. दहशतवादी जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमधून (Uri Sector) घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होते. सैन्य दलाचे जवान आणि बारामुल्ला पोलिसांनी घुसखोरी करणाऱ्या दहशथवाद्यांचा डाव उधळून लावत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ (LoC) या दहशतवाद्यांना जवानांनी कंठस्नान घातलं. जम्मू काश्मीर पोलिसांनी (Jammu Kashmir Police) गुरुवारी यासंदर्भातील महत्त्वाची माहिती दिली आहे.


काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमधील कमलकोट परिसरात मदियान नानक चौकी येथे सैन्य दलाने ही कारवाई केली आहे. काश्मीर झोनच्या पोलिसांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती देत सांगितलं आहे, 'उरीच्या कमलकोट सेक्टरमधील मादियान नानक चौकीजवळ लष्कर आणि बारामुल्ला पोलिसांनी घुसखोरी करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना ठार केलं आहे. यापूर्वी अखनूर सेक्टरमध्ये लष्कराने दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला होता.'


अखनूर सेक्टरमध्ये घुसखोरांचा डाव फसला


जम्मू-काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये सैन्य दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. सीमेपलीकडून आलेल्या दहशतवाद्यांचा लष्कराच्या जवानांनी पाठलाग केला. मागील चार दिवसांत जवानांनी दहशतवाद्यांचा चौथा डाव हाणून पाडला आहे. बुधवारी रात्री नौशेरा सेक्टरमध्येही दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराच्या जवानांनी हाणून पाडला.


एक दहशतवादी जिवंत पकडला 


नौशेरा सेक्टरमध्ये झालेल्या स्फोटात दोन दहशतवादी ठार झाले, तर लष्कराने एक दहशतवादी जिवंत पकडला आहे. नौशेरामधील झांगार सेक्टरमध्ये तैनात लष्कराच्या जवानांनी 21 ऑगस्ट रोजी सकाळी नियंत्रण रेषेवर दोन ते तीन दहशतवाद्यांना घुसखोरी करताना पाहिलं. एका दहशतवाद्याने भारतीय चौकीजवळ येऊन कुंपण कापण्याचा प्रयत्न केला. यावेळी सैनिकांनी दहशतवाद्यावर गोळीबार केला. तेव्हा त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या पायाला गोळी लागल्याने तो जखमी झाला आणि पकडला गेला. त्याच्यासोबत आलेले आणखी दोन दहशतवादी जंगलामध्ये पळून गेले.


महत्त्वाच्या इतर बातम्या