श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर सरकारने अनेक निर्बंध तेथे घातले होते. तेथील बंदी आता हळूहळू उठवण्यात येत आहेत. जम्मू काश्मीरमधील इंटरनेट सेवा आजपासून सुरु झाली आहे, तर फोन सेवाही आजपासून सुरु होऊ शकते, असं बोललं जात आहे. शाळा-कॉलेजही सोमवारपासून सुरु होणार आहेत.


जम्मू-काश्मीरमधील फोन सेवा लवकरच सुरु होणार आहेत. तर शाळा आणि कॉलेजही सोमवारपासून सुरु होणार आहे, अशी माहिती जम्मू काश्मीरचे मुख्य सचिव बी व्ही सुब्रमण्यम यांनी दिली. जम्मू काश्मीरच्या जम्मू, सम्बा, कथुआ आणि उधमपूर येथील 2G  इंटरनेट सेवा पूर्ववत झाली आहे.





जम्मू काश्मीर घाटीमध्ये सरकारी कार्यांलयातील कामकाज सुरु झालं आहे. अनेक कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची चांगली उपस्थितीही आहे. जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर परिस्थिती चिघळू नये यासाठी 5 ऑगस्ट रोजी अनेक बंदी घालण्यात आल्या होत्या. तेव्हापासून कोणतीही मोठी हिंसाचाराची घटना समोर आलेली नाही, अशी माहिती सुब्रमण्यम यांनी दिली.



येत्या काही दिवसात जम्मू काश्मीरमधील लागू करण्यात आलेल्या बंदी उठवण्यात येतील. परिस्थिती पूर्वपदावर येत असताना शांती राखण्यासाठी लोकाचं सहकार्य लक्षात घेत योग्य ती पावलं उचलली जातील. जम्मू काश्मीरच्या 12 जिल्ह्यांमध्ये जनजीवन सुरळीत आहे. केवळ पाच जिल्ह्यांत रात्री किमान निर्बंध आहेत, असं सुब्रमण्यम यांनी सांगितलं.




संबंधित बातम्या