श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पुलवामामधून शस्त्रासह बेपत्ता झालेला एका पोलिस अधिकारी  हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत सामील झाला आहे. इरफान अहमद असं या विशेष पोलिस अधिकाऱ्याचं (एसपीओ) नाव आहे.


एसपीओ इरफान अहमद हा पम्पोर पोलिस स्टेशनचे एसएचओच्या सुरक्षेत तैनात होता आणि सकाळपासून एके-47 या रायफलसह बेपत्ता होता. पुलवामाच्या लुलीपोरा नेवाजवळ त्याचं शेवटचं लोकेशन होतं.

पुलवामाच्या नेहामा काकापोराचा रहिवासी असलेला इरफान अहमद बेपत्ता झाल्याची माहिती पम्पोर पोलिस स्टेशनला आज (बुधवार) सकाळी मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. इरफान अहमद गायब होताच तो कोणत्यातरी दहशतवादी संघटनेत सामील झाल्याची कुणकुण पोलिस अधिकाऱ्यांना लागली होती.

जम्मू-काश्मीर पोलिसांकडून एसपीओ इरफान अहमदचा शोध घेण्यासाठी परिसराला घेराव घालून सर्च ऑपरेशन सुरु होतं. मात्र याच दरम्यान फरार एसपीओ इरफान अहमद आमच्या संघटनेत सामील झाल्याचा दावा हिजबुल मुजाहिद्दीनने केला.

याआधी 24 एप्रिल रोजी जम्मू काश्मीर पोलिसातील एक शिपाई तारिक अहमद पखेरपोरा बडगाम जिल्ह्यातून आपल्या एके-47 रायफल आणि दारुगोळ्यासह बेपत्ता झाला होता. तर एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच दक्षिण काश्मीरमधून बेपत्ता झालेला सैन्याचा एक जवान इदरीस मीर देखील हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत सामील झाल्याचं समोर आलं होतं.