नवी दिल्ली: देशभरातील सर्वाधिक जनतेची मातृभाषा हिंदी आहे हे आपल्यापैकी बहुसंख्यांना माहित आहे. मात्र हिंदीनंतर देशात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा कोणती? शिवाय देशात मराठी भाषेचा कितवा नंबर लागतो? या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहित आहेत?
देशातील 43.63 टक्के जनतेची मातृभाषा हिंदी आहे. सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये हिंदी भाषा पहिल्या स्थानावर आहे. तर दुसऱ्या नंबरवर बंगाली भाषा आहे. यानंतर सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषेत मराठीचा नंबर लागतो. म्हणजेच देशात तिसऱ्या नंबरवर मराठी भाषा आहे.
मराठीने तेलुगूला मागे टाकत, सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या यादीत तिसरा क्रमांक पटकावला आहे.
देशातील छोट्या छोट्या 22 भाषांपैकी संस्कृत भाषा ही सर्वात कमी लोकांची मातृभाषा आहे. बोडो, मणिपुरी, कोंकणी आणि डोगरी या भाषांपेक्षाही संस्कृत कमी बोलली जाते.
देशातील 2 लाख 60 हजार लोकांनी इंग्रजी ही पहिली बोलीभाषा असल्याचं सांगितलं. महत्त्वाचं म्हणजे त्यातील 1 लाख 6 हजार हे महाराष्ट्रातील आहेत. इंग्रजी प्रथम बोली भाषा मानणाऱ्यांमध्ये तामिळनाडू दुसऱ्या तर कर्नाटक तिसऱ्या स्थानावर आहे.