नवी दिल्ली : काश्मीरमध्ये गेल्या काही तासांत हालचालींना वेग आला आहे. मध्यरात्रीपासून श्रीनगरसह जम्मू-काश्मीरमधील अन्य जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू करण्यात आलं आहे. तसेच काल रात्रीपासून पीडीपीच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. या दोन्ही नेत्यांना घराबाहेर निघण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. राज्यातील शाळा, महाविद्यालयेदेखील बंद ठेवण्यात आली आहेत. तसेच संपूर्ण राज्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून, लँडलाईन सेवा देखील खंडित करण्यात आली आहे. काश्मीरमधील सचिवालय, पोलिस मुख्यालय, विमानतळ आणि अन्य संवेदशील ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.


आज सकाळी 9.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात काश्मीरमधील हालचालींबाबत महत्वाची बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीत काश्मीरसंदर्भात कुठला मोठा निर्णय होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कलम ३५ अ संदर्भात केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता असल्याचंही बोललं जात आहे.

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनी यासंदर्भात ट्विट करत आपल्याला नजरकैदेत ठेवण्यात येत असल्याची माहिती दिली आहे. आपल्यासह इतर महत्त्वाच्या नेत्यांनाही नजरकैदेत ठेवण्यात येत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.


"सध्या काय सुरु आहे हे काश्मीरच्या जनतेला माहीत नाही परंतू मला विश्वास आहे की अल्लाहने जो विचार कला असेल तो चांगला असेल. सर्वांना शुभेच्छा, सुरक्षित राहा आणि सर्वात महत्त्वाचं शांतता राखा", असं आवाहन ओमर अब्दुल्ला यांनी एका ट्विटद्वारे केलं आहे.


तर जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांनीदेखील ट्विट करत मोबाईल फोन कनेक्शनसह इंटरनेट सेवा बंद करण्यात येण्याची माहिती मिळाल्याचं ट्विट केलं आहे. तसेच आपल्याला नजरकैदेत ठेवण्यात येत असल्याबद्दल त्यांनी संतापही व्यक्त केला आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी भाजपचे नेते असूनही काश्मीरी जनतेचं त्यांच्यावर प्रेम होतं. आज त्यांची आठवण येत असल्याचं ट्विट देखील मेहबुबा यांनी केलं आहे.