Jammu-Kashmir Encounter: जम्मू -काश्मीरमध्ये गेल्या 24 तासांमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं आहे. सुरक्षा दलांनी आज (मंगळवार 24 ऑगस्ट) बारामुल्ला जिल्ह्यात झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. यापूर्वी सोमवारी जम्मू-काश्मीर पोलिसांनी श्रीनगरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.


बारामुल्लामध्ये झालेल्या चकमकीबाबत एका अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी सोमवारी रात्री उशिरा सोपोरच्या पेठसीर येथे घेराव आणि शोधमोहीम सुरू केली.


ते म्हणाले की, दहशतवाद्यांनी मंगळवारी पहाटे सुरक्षा दलांवर गोळीबार केला आणि चकमकीला सुरुवात झाली. सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, त्यांची ओळख पटवली जात आहे आणि त्यांच्या गटाचा शोध घेतला जात आहे.


दरम्यान, काश्मीर झोनचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले की, काश्मीरमध्ये यावर्षी 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले आहेत. कुमार यांनी ट्वीट केले की जम्मू -काश्मीर पोलीस, इतर सुरक्षा दल आणि काश्मीरच्या लोकांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे 2021 मध्ये काश्मीर क्षेत्रात आतापर्यंत 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.


श्रीनगरमध्ये दोघेजण ठार
जम्मू-काश्मीर पोलिसांनी सोमवारी लष्कर-ए-तय्यबाशी संलग्न असलेल्या 'द रेसिस्टन्स फोर्स (टीआरएफ)' या दहशतवादी संघटनेच्या दोन टॉप कमांडरला ठार केलं. शहरातील अनेक लोकांना ठार मारण्यात आणि तरुणांना शस्त्रे उचलण्यासाठी दिशाभूल करण्यात हे सहभागी होते.


टीआरएस प्रमुख अब्बास शेख आणि त्याचा सहकारी (उप) साकीब मंजूर हे शहरातील अलोची बाग परिसरात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाले, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.


काश्मीर झोनचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार म्हणाले, “आम्हाला त्यांच्या उपस्थितीची माहिती होती. साध्या गणवेशातील पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्काळ परिसराला वेढा घातला आणि दहशतवाद्यांना आव्हान दिल्यानंतर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला आणि त्यात दोघेही ठार झाले.