Defence Minister Rajnath Singh: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) हे आज जम्मू आणि काश्मीरच्या (Kashmir) दौऱ्यावर असताना त्यांनी दहशतवादाविरोधात भाष्य केलं आहे. त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अमेरिका आणि इजिप्तच्या दौऱ्याचा देखील उल्लेख केला आहे. राजनाथ सिंह हे जम्मू आणि काश्मीरच्या विश्वविद्यालयामध्ये राष्ट्रीय सुरक्षा संमलेनाला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा वाढवली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले कौतुक
यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये सत्ता सांभाळायला घेतल्यानंतर परिस्थिती बदलली असल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. दरम्यान जगभरात पंतप्रधान मोदी यांच्या वाढत्या प्रतिष्ठेचा उल्लेख करत राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बॉस म्हणून संबोधले आहे. पुढे बोलतांना त्यांनी म्हटलं की, 'अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटलं होतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी इतके लोकप्रिय आहेत की लोकं त्यांची स्वाक्षरी घेऊ इच्छितात.'
पंतप्रधान मोदींचे कौतुक करताना राजनाथ सिंह म्हणाले, 'मी त्यांचे कौतुक करतो, कारण त्यांना पटकन दहा मिनिटांत निर्णय घेता येतात. पंतप्रधान म्हणाले होते, ना मी खाणार, ना खाऊ देणार. भारतात प्रत्येक व्यक्तीचे बँकेत खाते कसे उघडण्याता आले आणि त्यामध्ये दर महिन्याला पैसे कसे जमा होऊ लागले हे मला देखील काही समजत नाही. आधी भारतात एक एम्स होते आता भारतात 22 एम्स आहेत आणि 225 वैद्यकीय महाविद्यालयं आहेत. भारताच्या शत्रूंनी अनेकदा भारतात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तान देखील सतत तो प्रयत्न करत असतो. पण दहशतवादाला पूर्णपणे कमकुवत करण्याचा प्रयत्न आमच्या सरकारने केला आहे.'
जगाला सहिष्णुतेचा मार्ग दाखवला
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं की, 'देशात दहशतवादाविरोधात अनेक कारवाई करण्यात येत आहेत. तर भारताने संपूर्ण जगाला दहशतवादाविरोधात सहिष्णुतेचा अर्थ सांगितला आहे. आम्ही दहशतवादाचा निधी थांबवला आहे, शस्त्रास्त्रे आणि ड्रग्जचा पुरवठा थांबवला आहे आणि दहशतवाद्यांना संपवण्याच्या दृष्टीने काम करण्यास देखील सुरुवात केली आहे.'
पाकव्याप्त काश्मीवर बोलतांना राजनाथ सिंह यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांनी म्हटलं की, 'पाकव्याप्त काश्मीरमध्ये आम्हाला फार काही करण्याची गरज नाही, तिथे जो काही दडपशाहीचा प्रयत्न होत आहे त्यामुळे तिथली लोकं म्हणत आहेत की आम्हाला भारतात सामील व्हायचं आहे. '