श्रीनगर - जम्मू-काश्मीर येथे लाल चौकात दहशतवादी हल्ला झाला. ग्रेनेडचा हल्ला करुन दहशतवाद्यांनी लाल चौकाला लक्ष्य केले. यात एका नागरिकाचा मृत्यू झाला, तर अन्य १२ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळतेय. जखमींना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. दहशतवाद्यांनी हा हल्ला श्रीनगरच्या हरि सिंह हाय स्ट्रीटवर केला.

गर्दीच्या ठिकाणाला केले लक्ष्य -
या हल्ल्यात अनेकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळतेय. गर्दीच्या ठिकाणी दुपारी १ वाजून २० मिनिटांनी हा हल्ला झाल्याचे पोलीसांनी सांगितले. घटनेनंतर सुरक्षारक्षकांनी तात्काळ परिसरात नाकेबंदी केली. त्यानंतर दहशतवाद्यांच्या विरोधात सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले.

महिन्यातील दुसरा हल्ला -
यापूर्वी २७ ऑक्टोबरला दिवाळीच्या पूर्वसंध्येला श्रीनगरमधील करन नगर भागात दहशतवाद्यांनी सीआरपीएफ १४४ बटालियनवर ग्रेनेड हल्ला केला होता. यात ६ जवान जखमी झाले होते. त्यामुळे गेल्या महिन्याभरातील हा दुसरा ग्रेनेड हल्ला आहे. तर गेल्या आठवड्यात कुलगाम येथे दहशतवाद्यांनी बेछुट गोळीबार केला होता. या गोळीबारात ६ मजूर जखमी झाले होते.