श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्याच्या हंदवाडामध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाचे 5 जवान शहीद झाले आहेत. यात एक कर्नल, एक मेजरसह दोन जवानांचा समावेश आहे. या कारवाईत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. यानंतर या परिसरातील मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. दुसरीकडे जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात देखील शनिवारी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले आहेत. या हल्ल्यात लश्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर हैदरला कंठस्नान घालण्यात आलं असल्याची माहिती आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं की, दक्षिण काश्मीरमधील दंगेरपुरा परिसरात सुरक्षा दलाने ही कारवाई केली.

एएआयनंच्या वृत्तानुसार भारत-पाकिस्तान सीमेवर शनिवारी रात्री दहशतवाद्यांशी सुरक्षा रक्षकांची चकमक झाली.हंदवाडात दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये सुमारे आठ तास ही धुमश्चक्री सुरु होती.  शहीदांमध्ये कमांडिंग ऑफिसर कर्नल अशुतोष शर्मा यांचा समावेश आहे.


कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा शहरातील चांगिमुला येथे काही स्थानिक नागरिकांना दहशतवादी बंदी बनवणार आहेत, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांकडून लष्कराला मिळाली होती. त्यानुसार, या ठिकाणी लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांची संयुक्त मोहिम राबवण्यात आली.

दहशतवादी घुसलेल्या भागात राहणाऱ्या लोकांना बाहेर काढण्यासाठी लष्कराचे 5 जवान आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलातील एक जवान अशा सहा जणांच्या टीमने इथं प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी इथल्या नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेरही काढलं. त्यावेळी, इथं लपून बसलेल्या दहशतवाद्यांना जवानांची चाहूल लागल्याने त्यांनी मोठ्या प्रमाणावर गोळीबार सुरु केला. जवानांनीही याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. यामध्ये दोन दहशतवादी मारले गेले. मात्र, आपल्या दोन लष्करी अधिकाऱ्यांसह दोन जवान आणि एक जम्मू-काश्मीर पोलीसांचा सब इन्स्पेक्टर असे पाच जण शहीद झाले, असे हंदवाडा मोहिमेच्या प्रवक्त्यांनी सांगितले.