Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात (Terrorism) प्रशासनाची जोरदार मोहीम सुरू आहे. जम्मू-काश्मीर प्रशासनाने शनिवारी अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममधील लेवार गावात हिजबुल मुजाहिद्दीनचा (Hizbul Mujahideen) कमांडर आमिर खान (Amir Khan) याच्या दुमजली इमारतीभोवतीच्या मालमत्तेवर बुलडोझर चालवला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलाम नबी खान उर्फ ​​आमिर खान हा हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉप ऑपरेशनल कमांडर आहे. तो 90 च्या दशकाच्या सुरुवातीला पाकव्याप्त काश्मीर (PoK) ओलांडून पळून गेला होता. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीर प्रशासनाने पहलगाम, अनंतनागमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी कमांडर आमिर खानची इमारत पाडली आहे.


 


 






सरकारी जमिनीवरील बांधकाम पाडले
अनंतनाग जिल्ह्यातील लेवार गावात जम्मू-काश्मीर प्रशासनाच्या संयुक्त ऑपरेशन टीमने ही कारवाई केली. हिजबुल कमांडर अमीर खानच्या घराभोवतालची कंपाउंड भिंत सरकारी जमिनीवर बांधली होती, अशी माहिती मिळत आहे, तीच जमीन प्रशासनाने बुलडोझरने जमीनदोस्त केली आहे. काश्मीर खोऱ्याला दहशतवादमुक्त करण्यासाठी तसेच सरकारवर लोकांचा विश्वास निर्माण करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.


 


हिजबुल कमांडरला 15 वर्षांचा तुरुंगवास
सुत्रांच्या माहितीनुसार याआधी 28 डिसेंबर रोजी श्रीनगरमधील स्थानिक न्यायालयाने हिजबुल मुजाहिदीन कमांडरला 15 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. बेकायदेशीर दहशतवादी (प्रतिबंध) कायदा (UAPA) न्यायालयाने, जम्मू आणि काश्मीर राज्य तपास संस्थेने केलेल्या तपासावर आधारित ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. यानंतर जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी ट्विट केले की, “श्रीनगर यूएपीए न्यायालयाने या दहशतवादी संघटनेचा जिल्हा कमांडर अमीर नबी उर्फ ​​अबू कासिम याला दोषी ठरवले, ज्याची राज्य तपास यंत्रणा (एसआयए) कडून चौकशी करण्यात आली होती. त्याला 15 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे."


 


हिजबुल मुजाहिद्दीनच्या मॉड्यूलचा पर्दाफाश


गेल्या आठवड्यात, जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा दलांनी 22 डिसेंबर रोजी हिजबुल मुजाहिद्दीनच्या मॉड्यूलचा पर्दाफाश केला. तसेच कुपवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या पाच साथीदारांनाही अटक केली. माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलिस आणि लष्कराच्या संयुक्त पथकाने दहशतवाद्यांचे तीन साथीदार अब्दुल रौफ मलिक, अल्ताफ अहमद पायर आणि रियाझ अहमद लोन यांना अटक केली.