जळगाव : किनगावजवळील मनूदेवी मंदिराच्या परिसरात टेम्पो पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला आहे. यात आभोडा येथील 12, केऱ्हाळा येथील 2 आणि रावेर येथील 2 असे 16 मजूर मृत्यूमुखी पडले आहेत तर 5 गंभीर जखमी झाले आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास किनगावजवळ आयशर टेम्पो पलटून हा अपघात झाला. दरम्यान, या अपघाताची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली आहे. अपघातग्रस्त झालेल्यांना पंतप्रधान कार्यालयाकडून मदत जाहीर करण्यात आली आहे.
अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान मदत निधीतून दोन लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींना 50 हजार रुपये मदत दिली जाणार आहे. या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाकडून ट्वीट करण्यात आले आहे. शोकाकुल कुटुंबाच्या दु:खात मी सहभागी असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडूनही आर्थिक मदत जाहीर
किनगाव टेम्पो अपघातातील मृत मजुरांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत तर जखमींच्या उपचाराचाही खर्च करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या.
कसा झाला अपघात?
माहितीनुसार या टेम्पोत पपई भरुन हा टेम्पो रावेरकडे निघाला होता. त्याचवेळी मध्यरात्रीच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्यानं टेम्पो पलटी झाला. या अपघातात 16 मजुरांचा मृत्यू झाला आहे. यात आभोडा येथील 12, केऱ्हाळा येथील 2 आणि रावेर येथील 2 असे 16 मजूर मृत्यूमुखी पडले आहेत तर 5 गंभीर जखमी झाले आहेत. यातील बहुतांश मृतक हे रावेर तालुक्यातील असल्यानं तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
Jalgaon Accident | "शोकाकुल कुटुंबाच्या दु:खात मी सहभागी" : पंतप्रधान नरेंद्र मोदी