नवी दिल्ली: 'एका निशस्त्र मुलीला बंदुकधारी लोक घाबरत आहेत' अशी जळजळीत टीका काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर केली आहे. शेतकरी आंदोलनातील टूलकिट प्रकरणात दिल्ली पोलिसांनी दिशा रवी या 21 वर्षीय विद्यार्थीनीला अटक केली आहे. सरकारच्या या निर्णयावर प्रियांका गांधींनी टीका केली आहे.


'डरते हैं बंदूकों वाले एक निहत्थी लड़की से, फैले हैं हिम्मत के उजाले एक निहत्थी लड़की से' ही एका प्रसिद्ध गाण्याची ओळ शेअर करत प्रियांका गांधीनी दिशा रवीच्या अटकेचा निषेध केला आहे. एका निशस्र मुलीला हे बंदुकधारी लोक घाबरत आहेत, निशस्त्र मुलीमुळे सामान्यांची हिंमत वाढत असल्याचं त्यांनी मत व्यक्त केलं आहे.





पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवीला अटक करणे आणि तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करणे या दिल्ली पोलिसांच्या कृतीवर अनेकांनी टीका केली आहे. शेतकरी आंदोलनातील नेत्यांनी आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी याचा विरोध केला असून दिशा रवीला तात्काळ सोडावं आणि तिच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी केली आहे.


पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करत एक टूलकिट शेअर केलं होतं. त्या टूलकिटचा आता दिल्ली पोलिसांनी खलिस्तानवादी अॅंगलने तपास सुरु केला असून त्यासंबंधी बंगळुरुतील 21 वर्षीय पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवीला अटक केली आहे.


ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरण, बंगळुरुतील पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवी अटकेत


ग्रेटा थनबर्गने शेअर केलेलं हे टूलकिट खलिस्तानवादी लोकांनी तयार केलं असून त्याचा उद्देश हा भारतात अशांतता निर्माण करायचा आहे असं दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केलंय. हे टूलकिट तयार करण्यात आणि ते शेअर करण्यात बंगळुरुच्या दिशा रवीची महत्वाची भूमिका आहे असा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. दिशा रवीवर आयपीसी कलम 124 अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा नोंद करण्यात आला असून तीला पाच दिवसांच्या पोलीस रिमांडमध्ये ठेवण्याची परवानगी पाटियाळा न्यायालयाने दिली आहे.


मलाला युसुफजईशी संबंधित गाणे
प्रियांका गांधी यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केलेल्या या गाण्याचा पाकिस्तानच्या मानवतावादी कार्यकर्ती मलाला युसुफजईशी थेट संबंध आहे. मलाला युसुफजईने पाकिस्तानमध्ये रुढीवादी परंपराविरोधात आवाज उठवला होता. त्यावेळी तिला दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या होत्या. सुदैवाने मलालाचा जीव यातून वाचला.


मलालाला समर्थन म्हणून पाकिस्तानच्या रॉक बॅण्ड 'लाल'ने एक गाणं तयार केलं होतं. या गाण्याचे बोल हे 'डरते हैं बंदूकों वाले एक निहत्थी लड़की से, फैले हैं हिम्मत के उजाले एक निहत्थी लड़की से' असं असून, हे गाणं मलालाला समर्पित केलं होतं. तैमुर हा तरुण या गाण्याचा लेखक, निर्माता आणि गायक आहे.


Toolkit Case: दिशा रवीच्या अटकेनंतर चर्चेत आलेले टूलकिट काय आहे? ते कशा प्रकारे काम करतं?