तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना हृदयविकाराचा झटका
एबीपी माझा वेब टीम | 04 Dec 2016 11:10 PM (IST)
चेन्नई : तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना हृदयविकाराचा झटका आला असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. जयललितांवर चेन्नईच्या अपोलो रुग्णालयाच्या तज्ज्ञ पथकांकडून उपचार सुरु आहेत. तामिळनाडूचे प्रभारी राज्यपाल सी. विद्यासागर राव मुंबईहून चेन्नईला रवाना झाले आहेत. तसेच तामिळनाडूच्या राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री व मुख्य सचिवांनीही हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. रुग्णालयाच्या बाहेर जयललिता यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली. त्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. जवळपास दोन महिन्यांपासून जयललिता यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरु आहेत. लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळणार होता. मात्र आज अचानक त्यांना हृदय विकाराचा झटका आला. पोलीस महासंचालकही मदुराईहून लगेच राजधानीत परतले व त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात वाढीव बंदोबस्त ठेवण्याच्या व गरज पडल्यास केंद्रीय दलांच्या तुकड्या मागवून घेण्याचेही आदेश दिले आहेत.