Twitter Handle Hacked : सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाचे (Jal Shakti Ministry) ट्विटर हँडल हॅक (Twitter Handle Hacked) झाल्याची माहिती मिळत आहे. गुरुवारी सकाळी हॅकर्सनी मंत्रालयाचे ट्विटर हँडल हॅक केले. यानंतर सुरक्षा यंत्रणा आणि सायबर तज्ज्ञांनी ट्विटर हँडल हॅकिंगशी संबंधित प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. यापूर्वी दिल्ली एम्सच्या सर्व्हरवरही सायबर हल्ला (Cyber Crime) झाला होता. त्यानंतर हॅकर्सनी संस्थेकडून क्रिप्टोकरन्सीमध्ये 200 कोटी रुपयांची मागणी केली असल्याचे समजते. मात्र, पोलिसांनी या वृत्ताबाबत नकार दिला असून अनेक दिवस सर्व्हर बंद पडल्याने सर्व कामे मॅन्युअली सुरू होती असे सांगितले आहे.


सर्वप्रथम पोस्ट केले 'हे' ट्विट


मीडिया रिपोर्ट्सनुसार, जलशक्ती मंत्रालयाच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून क्रिप्टो वॉलेटची जाहिरात करणारे एक ट्विट सकाळी 5:38 वाजता सर्वप्रथम पोस्ट करण्यात आले होते. हॅकर्सकडून अकाऊंटचा लोगो तसेच कव्हर पिक्चरसह प्रोफाइल चित्र देखील बदलण्यात आले होते. मंत्रालयाच्या ट्विटर हँडलवरून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये अनेक अनोळखी अकाऊंट देखील टॅग करण्यात आले होते. मात्र, काही वेळातच हे अकाऊंट रिस्टोअर करण्यात आले आणि संशयास्पद ट्विट काढून टाकण्यात आले. सुरक्षा एजन्सी आणि सायबर तज्ज्ञ आता या घटनेचा तपास करत आहेत.


 




 



हॅकर्सनी केले होते 80 पेक्षा जास्त ट्विट


टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, हॅकर्सनी स्वच्छ भारत आणि इतर मंत्रालयांना टॅग करत अनेक ट्विट केले. हॅकर्सनी 80 हून अधिक ट्विट केले होते. काही ट्विटमध्ये पाकिस्तानी अकाऊंट देखील टॅग केली आहेत आणि त्यात क्रिप्टो-आधारित ट्विटर अकाऊंट्सच्या लिंक्स आहेत. दरम्यान, जलशक्ती मंत्रालयाने या हॅकिंगच्या घटनेला दुजोरा दिला आहे. दरम्यान, आता सर्व ट्विट्स डिलीट करण्यात आली आहेत, आतापर्यंत कोणत्याही हॅकर ग्रुपने हॅकिंगची जबाबदारी घेतलेली नाही.


दिल्ली एम्सच्या सर्व्हरवर सायबर हल्ला
यापूर्वी 23 नोव्हेंबर रोजी सकाळी दिल्ली एम्सचे मुख्य सर्व्हर डाऊन झाले होते. मुख्य सर्व्हर डाऊन झाल्याने याच्या ऑनलाइन सेवांवर मोठा परिणाम झाला. स्लिप बनवण्यासह इतर सर्व कामांवर परिणाम होत असल्याने हजारो रुग्णांचे हाल झाले. बुधवारी सायंकाळपर्यंत सर्व्हर ठप्प होता. त्यानंतर इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In), दिल्ली पोलीस आणि गृह मंत्रालयाचे प्रतिनिधी याचा तपास करत होते.


इतर महत्वाच्या बातम्या


LPG Gas Cylinder Price: एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कपात? जाणून घ्या नवीन दर