Gujarat Election 2022: गुजरातमध्ये (Gujrat News) पहिल्या टप्प्यासाठी सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. 19 जिल्ह्यांतील 89 जागांवर मतदान करण्यासाठी मतदार रांगा लावू लागले आहेत. हे मतदान सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालणार आहे. या पहिल्या टप्प्यात 788 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र काही उमेदवार असे आहेत जे तिकीट मिळाल्यापासूनच चर्चेत आहेत. त्यापैकी एक म्हणजे, टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) याची पत्नी रिवाबा जाडेजा. रिवाबा भाजपच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात आहे. 




रवींद्र जाडेजाकडून बाळासाहेब ठाकरेंचा जुना व्हिडीओ


गुजरात निवडणुकीत सर्वात अधिक चर्चेत असलेले उमेदवार म्हणजे, रिवाबा जाडेजा. तिकीट मिळाल्यापासूनच रिवाबा चर्चेत आहेत. पण यावरुन जाडेजा कुटुंबात मात्र मोठी फूट दिसतेय. जाडेजाची पत्नी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवतेय. तर रवींद्र जाडेजाची मोठी बहिण मात्र काँग्रेसचा प्रचार करताना दिसतेय. तसेच, यामध्ये रवींद्र जाडेजा आपल्या पत्नीच्या बाजूनं तर त्याचे वडिल आपल्या मुलीच्या बाजूनं असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच निवडणुकीच्या रणधुमाळीत रवींद्र जाडेजाच्या एका ट्वीटची जोरदार चर्चा सुरु आहे. रवींद्र जाडेजानं बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच, हा व्हिडीओ ट्वीट करताना 'अजूनही वेळ आहे, समजून घ्या गुजरातींनो' असं कॅप्शन जाडेजानं लिहिलं आहे. जाडेजाच्या या ट्वीटनंतर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. ही निवडणूक केवळ पंतप्रधान मोदींचा हवाला देऊन लढवली जात आहे का? असेही प्रश्न सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून विचारले जात आहेत. 


आज गुजरात निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात मतदान 


जाडेजाच्या पत्नीबद्दल बोलायचं तर ती उत्तर जामनगर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहे. रिवाबा यांनी 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. दुसरीकडे, रवींद्र जाडेजाचे वडील आणि बहीण काँग्रेस उमेदवाराचा प्रचार केला, तेव्हा रविंद्र जाडेजाच्या पत्नी रिवाबा यांनी कुटुंबात मतभेद नसून केवळ विचारधारेचा मुद्दा असल्याचं म्हटलं होतं. 182 जागांच्या गुजरात विधानसभेत 89 जागांवर निवडणूक लढवणाऱ्या 788 उमेदवारांपैकी रिवाबा एक आहेत. 2017 मध्ये भाजपचे धर्मेंद्रसिंह जाडेजा येथून निवडणूक जिंकले होते. यावेळी पक्षाकडून त्यांना तिकीट नाकारण्यात आलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, 2012 मध्ये काँग्रेसचे धर्मेंद्रसिंह जाडेजा येथून निवडणूक जिंकले, पण पुढच्या निवडणुकीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.


महत्वाच्या इतर बातम्या


Gujrat Assembly Election 2022 : गुजरात विधानसभेचं आज पहिल्या टप्प्यातील मतदान; 89 जागांसाठी 788 उमेदवार मैदानात