Rahul Gandhi on Jaishankar : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल मोदींना भाषणांवरून घेरल्यानंतर आज (23 मे) परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यावर पुन्हा हल्लाबोल करताना 3 प्रश्न विचारले आहेत. एक दिवस आधी राहुल यांनी ऑपरेशन सिंदूर आणि भारत-पाकिस्तान युद्धबंदीबद्दल पंतप्रधान मोदींना 3 प्रश्न विचारले होते. राहुल यांनी काँग्रेसच्या एक्स पोस्टची (ट्विटर) एक क्लिप शेअर केली आहे ज्यामध्ये जयशंकर डच ब्रॉडकास्टर एनओएसला मुलाखत देत आहेत. यामध्ये जयशंकर यांनी पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणावावर प्रश्नांची उत्तरे दिली होती. राहुल यांनी ट्विट करत म्हटले आहे की, जेजे समजावून सांगतील का की, भारताला पाकिस्तानशी का जोडले गेलं आहे? पाकिस्तानचा निषेध करण्यात एकाही देशाने आम्हाला पाठिंबा का दिला नाही? ट्रम्प यांना भारत आणि पाकिस्तानमध्ये "मध्यस्थी" करण्यास कोणी सांगितले? भारताचं परराष्ट्र धोरण कोलमडलं आहे.

भाजपने राहुल गांधींना निशाण-ए-पाकिस्तान म्हटले

दरम्यान, भाजपने म्हटले की राहुल गांधींनी सैन्याच्या शौर्याला कमी लेखणे थांबवावे. असे प्रश्न विचारणे थांबवावे जे विचारू नयेत. ते राष्ट्रीय सुरक्षेला धोक्यात आणतात. त्यांच्या वक्तव्यांना बालिश वर्तन म्हणून नाकारता येणार नाही. भाजप प्रवक्ते गौरव भाटिया यांनी राहुल गांधींना निशाण-ए-पाकिस्तान म्हटले. त्यांनी म्हटले की, भारत-पाकिस्तान संघर्षावर राहुल गांधींच्या टिप्पण्यांचा वापर इस्लामाबाद भारताला बदनाम करण्यासाठी करत आहे. ऑपरेशन सिंदूर सुरू आहे. म्हणून बेजबाबदार टिप्पण्या करून देशाची सुरक्षा धोक्यात आणणे थांबवा.

काल राहुल यांनी मोदींना 3 प्रश्न विचारले होते

दुसरीकडे, राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना 3 प्रश्न विचारले होते. जे दहशतवाद, पाकिस्तान आणि भारत आणि पाकिस्तानमधील मध्यस्थीचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा यावर होते. राहुल यांनी पंतप्रधान मोदींच्या राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणाची व्हिडिओ क्लिप देखील जोडली होती. यामध्ये पंतप्रधान मोदी असे म्हणताना ऐकू येतात की, जेव्हा पाकिस्तानने म्हटले की ते यापुढे दहशतवादी कारवाया आणि लष्करी धाडस दाखवणार नाही, तेव्हा भारतानेही ते विचारात घेतले. राहुल यांनी एक्स पोस्टमध्ये लिहिले की, मोदीजी, पोकळ भाषणे देणे बंद करा आणि एवढेच सांगा की, तुम्ही भारताच्या सन्मानाशी तडजोड केली आहे. दहशतवादावर तुम्ही पाकिस्तानवर विश्वास का ठेवला? ट्रम्पसमोर नतमस्तक होऊन तुम्ही भारताच्या हिताचे बलिदान का दिले? तुमचे रक्त फक्त कॅमेऱ्यांसमोरच का तापते? असे प्रश्न विचारले होते. 

राहुल गांधींचे हे विधान 22 मे रोजी राजस्थानमधील बिकानेरमध्ये पंतप्रधानांनी दिलेल्या विधानानंतर आले. पलाना परिसरातील सभेदरम्यान पंतप्रधान म्हणाले की, पाकिस्तान भारताशी थेट लढाई जिंकू शकत नाही. म्हणूनच त्यांनी दहशतवादाला भारताविरुद्ध शस्त्र बनवले आहे. पाकिस्तान एक गोष्ट विसरला की आता भारतमातेचा सेवक मोदी छाती फुगवून येथे उभा आहे. मोदींचे मन थंड आहे, थंड राहते, परंतु मोदींचे रक्त गरम आहे. आता मोदींच्या नसांमध्ये रक्त नाही तर गरम सिंदूर वाहत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या