हैदराबाद : वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे निवडणुकीवेळी मतं मिळवण्यासाठी सहानुभूतीचा वापर करत आहेत. यामुळे संतापलेले जगनमोहन रेड्डी म्हणाले, “मुख्यमंत्र्यांच्या या प्रयत्नांसाठी त्यांना गोळी जरी मारली तरी चूक ठरणार नाही.”
आंध्र प्रदेशमधील नंदयाल मतदारसंघात पोटनिवडणूक आहे. तिथे प्रचारसभेत वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांनी चंद्राबाबू नायडू यांच्यावर अनेक आरोप केले. “आंध्र प्रदेशातील लोकांना खोटी आश्वासनं देणं, खोटं वचन देणं आणि प्रत्येक मुद्द्यावर दुटप्पी वक्तव्य करणाऱ्या चंद्राबाबू नायडू यांना गोळी मारली पाहिजे.", असे रेड्डी म्हणाले.
शिवाय, “नायडू यांनी शेतकरी, महिला, अल्पसंख्यांक, बेरोजगार यांना खूप सारी आश्वासनं दिली. मात्र, कोणतेही आश्वासन ते पूर्ण करु शकले नाहीत. नायडू हे कपटी आणि कलयुगी राक्षसाप्रमाणे आहेत.”, असा घणाघातही रेड्डींनी केला.
12 मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्यामुळे नंदयालमधील आमदार भूमी नागी रेड्डी यांचं निधन झालं. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक घेतली जात आहे. टीडीपी आणि वायएसआर काँग्रेस या दोन्ही पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
23 ऑगस्ट रोजी नंदयालमध्ये मतदान होणार आहे आणि 28 ऑगस्टला निकाल लागेल.
चंद्राबाबूंना गोळी मारायला हवी, जगनमोहन रेड्डींचं वादग्रस्त वक्तव्य
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Aug 2017 12:11 PM (IST)
खोटी आश्वासनं देणाऱ्या चंद्राबाबू नायडू यांना गोळी मारली तरी चूक ठरणार नाही, असं वक्तव्य जगनमोहन रेड्डी यांंनी केले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -