चेन्नई : एआयएडीएमकेने पक्षाचं महासचिवपद रद्द करुन तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता या कायमस्वरुपी पक्षाच्या महासचिव असतील, असा निर्णय घेतला आहे. या घोषणेसोबतच जयललिता यांच्या निकटवर्तीय शशीकला यांचं पक्षातील अस्तित्व जवळपास संपुष्टात आलं आहे.


या निर्णयावर आता मद्रास हायकोर्टाकडून शिक्कामोर्तब होणं बाकी आहे. कोर्टानेच एआयएडीएमकेच्या बैठकीला परवानगी दिली होती. कारण शशीकला समर्थकांनी कोर्टात धाव घेतली होती. एआयएडीएमकेच्या या बैठकीत शशीकला गटाचे 18 आमदार सहभागी झाले नव्हते.

एआयएडीएमकेच्या बैठकीला पक्षाच्या 2 हजार सदस्यांनी उपस्थिती लावली. तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री ओ पन्नीरसेल्वम यांची 11 सदस्यिय समितीच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली. मुख्यमंत्री ई पलानीसामी आणि ओ पन्नीरसेल्वम यांच्या गटांच्या विलीनीकरणावर यानंतर अधिकृतपणे शिक्कामोर्तब करण्यात आलं.

शशीकलाची पक्षातून हकालपट्टी केली जावी, अशी मागणी पन्नीरसेल्वम गटाची होती. शशीकला यांनी जयललिता यांच्या निधनानंतर पन्नीरसेल्वम यांना मुख्यमंत्रीपद सोडण्यास भाग पाडलं होतं.

दोन्ही गटांचं विलीनीकरण झाल्यानंतर पन्नीरसेल्वम उपमुख्यमंत्री असतील, याबाबतही निर्णय घेण्यात आला. तर दुसरीकडे विरोधी पक्षातील डीएमकेचे नेते एमके स्टॅलिन यांनी राज्यपालांची भेट घेऊन आपल्याकडे बहुमताचा आकडा असल्याचा दावा केला.

शशीकला यांचा भाचा दिनाकरननेही स्टॅलिन यांच्यासोबत राज्यपालांची भेट घेतली. बहुमतासाठी 117 सदस्यांची आवश्यकता आहे. कारण तामिळनाडू विधानसभेत एकूण सदस्य संख्या 234 एवढी आहे. युनायटेड एआयएडीएमकेने 124 सदस्यांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे.

पलानीसामी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा त्यांचं सरकार पाडण्यात येईल, असा इशारा दिनाकरन यांनी दिला आहे.