केवळ पाच एटीएम व्यवहार मोफत, PNB चा नवा नियम
एबीपी माझा वेब टीम | 12 Sep 2017 07:26 PM (IST)
खात्याची चौकशी, फंड ट्रान्सफर आणि ग्रीन पिन रिक्वेस्ट यांसाठी कोणतंही अधिकचं शुल्क आकारलं जाणार नाही, असंही कंपनीने स्पष्ट केलं आहे.
नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) ग्राहकांना एका महिन्यात पाच पेक्षा जास्त वेळा एटीएममधून पैसे काढल्यास अतिरिक्त पैसे माजावे लागणार आहेत. ऑक्टोबरपासून हा नियम लागू होईल. सध्या पीएनबी बँकेच्या ग्राहकांना एटीएम व्यवहारांवर मर्यादा नाही. पीएनबी एटीएममधून पीएनबीच्या ग्राहकांसाठी मोफत एटीएम व्यवहारांची संख्या आणि मोफत व्यवहारांच्या मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार करण्याच्या नियमात बदल करण्यात आला आहे. 1 ऑक्टोबर 2017 पासून नवीन नियम लागू होतील, अशी सूचना बँकेने ग्राहकांना केली आहे. बचत, चालू आणि ओव्हरड्राफ्ट खातेधारकांना महिन्यात पाच एटीएम व्यवहार केल्यानंतर 10 रुपये प्रती व्यवहार याप्रमाणे शुल्क आकारलं जाईल, असं बँकेने म्हटलं आहे. पीएनबीच्या ग्राहकाने पीएनबीच्याच एटीएममधून जास्त वेळा पैसे काढले तरीही हा नियम लागू असेल. दरम्यान खात्याची चौकशी, फंड ट्रान्सफर आणि ग्रीन पिन रिक्वेस्ट यांसाठी कोणतंही अधिकचं शुल्क आकारलं जाणार नाही, असंही कंपनीने स्पष्ट केलं आहे.