चेन्नई : तामिळनाडूचे मुख्य सचिव राममोहन राव यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. अण्णानगरमध्ये त्यांचं निवासस्थान आहे. काही दिवसांपूर्वी इथे पैसे बदलण्याच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला होता.
सुत्रांच्या माहितीनुसार, शेखर रेड्डी यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर आयकर विभागाने छापा टाकला. आयकर विभागाने काही दिवसांपूर्वीच पैसे बदलण्याच्या एका मोठ्या रॅकेटचा भांडाफोड केला होता. यात 90 कोटींची रोकड आणि 100 किलो सोनं जप्त करण्यात आलं होतं. याप्रकरणी श्रीनिवास रेड्डी, शेखर रेड्डी आणि प्रेम यांना ताब्यात घेऊन चौकशी केली.
गोपनीय माहिती मिळाल्यानंतर आयकर विभागाने अण्णानगर आणि टी नगरसह आठ ठिकाणांवरील दागिन्यांच्या दुकानांवर एकाचवेळी धाड टाकली. इथूनच 90 कोटी रुपयांची रोकड आणि 100 किलो सोनं जप्त करण्यात आलं. या सोन्याची किंमत सुमारे 30 कोटी रुपये असल्याचं कळतं. जप्त केलेल्या रोख रकमेत 80 कोटींच्या 500 आणि 1000 च्या नोटांचा समावेश आहे.