नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांवर टीका करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी (29 मार्च) केलेल्या एका ट्वीटमुळे विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. कभी कभी मौन सबसे अच्छा उत्तर होता हैं..., असं ट्वीट करत यापुढे आपलं उत्तर हे मौन असणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान संजय राऊत यांनी थोडा उशीर केला अशाप्रकारच्या प्रतिक्रिया भाजप नेत्यांनी दिल्या. त्यावर भाजप नेत्यांचा भ्रमनिरास झाला असेल. भाजपला माझी भीती वाटणं स्वाभाविक आहेस कारण मी जेवढं कमी बोलेन तेवढं त्यांना सोयीचं आहे, असं उत्तर संजय राऊत यांनी दिलं. मौन धारण केल्याच्या चर्चांनंतर संजय राऊत यांनी 'एबीपी माझा'सोबत एक्स्लुझिव्ह संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.


संजय राऊत शिवसेनेचा आवाज कोणीच बंद करु शकत नाही : संजय राऊत
"भाजपचे लोक ध चा मा करण्यात पटाईत आहेत. मी काल काही विषयावर बोलणं टाळलं. एखाद्या विषयावर रोज बोललंच पाहिजे असं नाही. पक्षाची भूमिका असेल तेव्हाच आम्ही बोलतो. भाजपला माझी भीती वाटणं स्वाभाविक आहेस कारण मी जेवढं कमी बोलेन तेवढं त्यांना सोयीचं आहे. त्यामुळे काल त्यांनी बरेच पतंग उडवले. पण संजय राऊत, शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचा आवाज कोणी बंद करु शकणार नाही. कारण आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत घडलेली माणसं आहोत." 


तपास गुप्त पद्धतीने सुरु आहे : संजय राऊत
किरीट सोमय्या, नील सोमय्या तसंच नारायण राणे यांच्याबद्दल महाविकास आघाडीने नरमाईची भूमिका घेतली आहे का असं विचारलं असता संजय राऊत म्हणाले की, काही तांत्रिक आणि कायदेशीर बाबी असतात. मुंबई पोलीस किंवा कोणतीही तपास यंत्रणा आम्ही तपास करणार नाही, असं सांगणार नाही. यावेळी तपास गुप्त पद्धतीने सुरु आहे, कारण गुन्ह्यांची व्याप्ती मोठी असल्याने मुख्य गुन्हेगारांपर्यंत पोहोचायला वेळ लागतो. कोर्टात काही सांगितलं म्हणून भविष्यात काही नसेल असं नाही. 


शिवसेना ही वाघाची गर्जना आहे आणि वाघ कधी मौनात जात नाही. आम्ही कमी बोलल्यामुळे भाजपच्या नेत्यांनी किंवा राजकीय विरोधकांनी आनंद साजरा केला असेल. मी त्यांच्या आनंदात मीठाचा खडा टाकला नाही. राजकारणातील विरोध हा तात्विक असतो. भाजपचे लोक ज्या पद्धतीने द्वेषाने, सुडाने आणि बदल्याच्या भावनेने वागतात तसं शिवसेना कधी वागत नाही, असं संजय राऊत यांनी नमूद केलं.


'...तर शिवसेनेला स्वबळावर राज्य आणावं लागेल'
शिवसेनेचे काही नेत्यांनी राष्ट्रवादीबाबत नाराजी व्यक्त केली. त्याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, आज आमचे काही खासदार बोलत आहेत,  भाजपसोबत आमचं सरकार असतानाही त्यांची हीच खंत होती. ही भूमिका बदलायची असेल तर शिवसेनेला स्वबळावर राज्य आणावं लागेल. आता आमचे जे नेते बोलत आहेत त्यांनी स्वबळाची तयारी ठेवली पाहिजे. कोणतंही आघाडीचं सरकार असलं तरी अशाप्रकारच्या ठिणग्या उडत राहतात. आज जे राष्ट्रवादीवर राग व्यक्त करत आहेत, त्यांचा काल भाजपवर ही राग होता आणि त्या रागातूनच हे सरकार स्थापन झाला आहे.


वरुण गांधींसोबतच्या भेटीबाबत राऊत काय म्हणाले?
भाजप खासदार वरुण गांधी यांनी काल संजय राऊत यांची भेट घेतली. दोघांमध्ये तीन तास चर्चा झाली. या भेटीविषयी राऊत म्हणाले की, "गांधी कुटुंबासोबतचे माझे संबंध पूर्वीपासूनच जिव्हाळ्याचे आहेत. या देशातील राजकारणातील ते महत्त्वाचं कुटुंब आहे. देशासाठी त्याग केलेल्या कुटुंबापैकी ते कुटुंब आहे. त्यामुळे त्यांच्याशी संबंध ठेवणं हे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आज आम्ही राज्यात काँग्रेससोबत सत्तेत आहोत." वरुण गांधी यांचा वेगळा विचार सुरु आहे का आणि शिवसेना तो पर्याय आहे का, यावर संजय राऊत म्हणाले की, "आम्ही त्यावर चर्चा केली नाही. दोघेही विचारांची आदानप्रदान करतो. ते हिंदुत्त्ववादी आहेत. त्यांना शिवसेनेच्या प्रखर हिंदुत्त्ववादाचं आकर्षण आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याविषयी त्यांना ममत्व आहे. तर बाळासाहेब ठाकरे यांचे ते सच्चे भक्त राहिलेले आहेत."