नवी दिल्ली : भाजप खासदार वरुण गांधी यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची दिल्लीत भेट घेतली. संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी मंगळवारी (29 मार्च) रात्री ही बैठक झाली. सुमारे तीन तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. संजय राऊत यांनी वरुण गांधी यांना जेवणासाठी आमंत्रित केलं होतं. दरम्यान संजय राऊत आणि वरुण गांधी यांच्या 'डिनर डिप्लोमसी'मुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. चर्चेचा तपशील मात्र अद्याप समजू शकलेला नाही.
25 वर्षे युतीमध्ये एकत्र राहिलेले शिवसेना आणि भाजप महाराष्ट्रातील 2019 च्या निवडणुकीच्या निकालानंतर वेगळे झाले. मुख्यमंत्रीपदावरुन दोन्ही पक्षांमध्ये कटुता आली. आता दोनही पक्षातील नेते एकमेकांवर टीकेचे बाण सोडल्याशिवाय राहत नाहीत. मात्र याच दरम्यान राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची राजकीय घडामोड घडली. भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली.
वरुण गांधी भाजपवर नाराज?
दुसरीकडे वरुण गांधी यांनी काही काळापासून स्वत:ला भाजपपासून अलिप्त ठेवल्याचं पाहायला मिळतं. भाजपवर ते नाराज असल्याचीही चर्चा आहे. वरुण गांधी हे उत्तर प्रदेशातील पिलीभीतचे खासदार आहे. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन भाजपचं नाव काढलं. त्यातच उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपासून वरुण गांधी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर भाजपलाच घेरताना दिसत आहेत. इतकंच नाही तर पक्षातील नेत्यांवर तोंडसुख घेतानाही ते दिसतात. त्यामुळे लवकरच वरुण गांधी भाजपला सोडचिठ्ठी देणार असल्याचं म्हटलं जात.
राजकीय परिस्थिती बदलली, वरुण गांधी पक्षापासून अलिप्त झाले
वरुण गांधी सध्या सोशल मीडियावरील आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. गांधी कुटुंबातील महत्त्वाचा सदस्य असलेल्या वरुण गांधी यांचं भाजपमध्ये जोरदार स्वागत झालं. भाजप नेतृत्त्वाने त्यांना 2013 मध्ये सर्वात कमी वयाचे सरचिटणीस देखील बनवलं. त्यांची लोकप्रियता पाहता भाजपने त्यांची पश्चिम बंगालचे प्रभारी म्हणून नेमणूक केली. पण जसजसं राजकीय परिस्थिती बदलत गेली तसतसे वरुण गांधी यांचं पद, सन्मान आणि महत्त्व कमी होऊ लागलं. एकेकाळी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार समजले जाणारे वरुण गांधी आज पक्षापासून पूर्णत: अलिप्त आहेत. अनेक वेळा त्यांनी स्वपक्षीयांवर तोंडसुख घेतलं, विविध मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित करुन पक्षाला अडचणीत आणलं. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये घोषित आपल्या नव्या टीममधून वरुण गांधी आणि मनेका गांधी यांना बाहेर ठेवून कठोर संदेश दिला होता की, पक्ष वरुण गांधी यांची ही वृत्ती सहन करणार नाही.