नवी दिल्ली : 13 हजार कोटी रुपयांची अघोषित संपत्ती जाहीर करणारा गुजरातमधील उद्योजक महेश शाह याला शनिवारी नाट्यमयरित्या ताब्यात घेण्यात आलं. मात्र आयकर विभागानं चौकशी करुन महेश शाहला सोडून दिल्याची माहिती आहे.
इन्कम डिस्क्लोजर योजनेअंतर्गत 13 हजार कोटींचं काळं धन असल्याचं कबूल करत शाह गायब झाला होता. त्यानंतर शनिवारी एका टी.व्ही. चॅनलवरील चर्चेत महेश शाह सहभागी झाला होता. त्यावेळी आयकर विभाग आणि पोलिसांनी शाह याला भरचर्चेतून ताब्यात घेतलं होतं.
दरम्यान, सोमवारी सकाळी 11 वाजता पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश महेश शाहला देण्यात आले आहेत. महेश शहानं आपल्या संपत्तीचा खुलासा केला असला तरी त्यानं याचा दंड भरला नव्हता. महेश शाहचा जमिनीच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय होता, अशी माहिती त्यांच्या सीएने दिली आहे. आयकर विभागानं शाहचं घर आणि त्याचा सीए तहमूल सेठना यांचं कार्यालय आणि घरी 29 नोव्हेंबरपासून 1 डिसेंबरपर्यंत तपासणी केली.
6,237 कोटी रुपये टॅक्स म्हणून द्यायचे
महेश शाहनी 13,860 कोटी रुपयांच्या काळ्या पैशांचा खुलासा केला आहे. इन्कम डिस्क्लोजर स्कीम अंतर्गत त्यांना 45% रक्कम टॅक्स म्हणून द्यायची आहे. याप्रमाणे त्यांना एकूण 6237 कोटी रुपये टॅक्स द्यायचा आहे. स्कीमअंतर्गत पहिला हफ्ता 1560 कोटी रुपयांचा आहे.
महेश शाहांच्या घरासह कार्यालयावर छापा
एक सामान्य घरात राहणाऱ्या महेश शाहांना चार हफ्त्यांमध्ये 45 टक्के टॅक्स भरायचा होता. महेश शाहांना 30 नोव्हेंबरला टॅक्स म्हणून 25 टक्के म्हणजेच 1560 कोटी रुपये जमा करायचे होते. पण मुदत संपल्याने आयकर विभागाने 28 नोव्हेंबरलाच संपूर्ण डिस्क्लोजर रद्द करुन, 29 आणि 30 नोव्हेंबरला महेश शाह आणि त्याचा सीए तेहमूल सेठनाच्या जागांवर छापा टाकला. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी महेश शाहांच्या घर आणि कार्यालयांसह, चार्टर्ड अकाऊंट फर्म ‘अप्पाजी अमीन’ वरही छापा टाकला आहे.