नवी दिल्ली : आयकर विभाग आपल्या घरावर धाड मारणार आहे, असा दावा माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिंदबरम यांनी केला आहे. निवडणुकीतील प्रचारातून लक्ष विचलित करण्यासाठी सरकारच्या सांगण्यावरुन ही कारवाई होत असल्याचा आरोपही चिंदबरम यांनी केला आहे.


कालच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या दोन निकवर्तीयांच्या घरावर आयकर विभागाने धाडी टाकत तब्बल 9 कोटी रुपये जप्त केले. या कारवाईनंतर पी. चिंदबरम यांनी ट्वीट करत आपल्या घरावरही आयकर विभाग धाड मारणार असल्याची माहिती दिली. "माझ्या शिवगंगा येथील घरावर आयकर विभाग धाड मारणार आहे. आम्ही सर्च पार्टीचं स्वागत करतो. लपवण्यासारखं माझ्याकडे काहीच नाही हे आयकर विभागाला माहित आहे. याआधीही आयकर आणि इतर संस्थांनी माझ्या घराची झडती घेतली आहे आणि त्यात काहीच मिळालं नव्हतं. मात्र केवळ निवडणुकीतील प्रचारातून लक्ष विचलित करण्यासाठी ही कारवाई केली जात आहे", असा आरोप चिंदबरम यांनी केला.





"लोक या सरकारचा अत्याचार पाहत आहेत आणि निवडणुकीत त्यांना चांगला धडा शिकवतील", असंही पी. चिंदबरम यांनी म्हटलं. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनीही सरकारच्या या कारवाईवर निशाणा साधला आहे. "विरोधकांना निष्प्रभ करण्याचं मोदींचं नवं अस्त्र, आयकर खातं! लवकरच महाराष्ट्रातही!" देशभरात सुरु असलेल्या आयकर धाडी या विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी होत असल्याचा आरोप होत आहे.





मध्यप्रदेशात आयकर विभागाने मुख्यमंत्री कमलनाथ यांचे दोन निकवर्तीय राजेंद्र मिगलानी आणि प्रविण कक्कड यांच्या घरावर धाडी टाकत तब्बल 9 कोटी रुपये जप्त केले. प्रवीण कक्कड हे कमलनाथ यांचे सचिव आहेत. राजधानी दिल्ली आणि मध्यप्रदेशात भोपाळ आणि इंदुरसह देशभरात 6 ठिकाणी या धाडी टाकण्यात आल्या. स्थानिक पोलिस आणि सीआरपीएफमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता. स्थानिक पोलिस आम्हाला काम करु देत नसल्याचा आरोप सीआरपीएफने केलाय.