हैदराबाद: भारतीय आयटी उद्योगातील दिग्गज आणि इन्फोसिसचे माजी सीएफओ टीवी मोहनदास पै यांनी एक धक्कादायक आरोप केला आहे. 'देशातील मोठ्या आयटी कंपनींनी नव्यानं भरती केलेल्या कर्मचाऱ्यांचा पगार कमी ठेवण्यासाठी कथित स्वरुपात लॉबिंग सुरु केलं आहे. देशभरात मोठ्या प्रमाणात सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. त्यामुळे त्यांच्या मोठ्या संख्येचा फायदा या कंपन्या उठवत आहेत.' असं पै म्हणाले.


मोहनदास पै पुढं असंही म्हणाले की, 'भारतीय आयटी उद्योग आपल्या नव्या कर्मचाऱ्यांना योग्य पगार देत नाही. इतकंच नव्हे तर नव्या कर्मचाऱ्यांना पगार वाढवून देऊ नये यासाठी ते एकजूट होत आहेत. तसंच ते याविषयी आपआपसात चर्चाही करत असतात.'

रिपोर्टनुसार, दोन दशकापूर्वी या उद्योगात नव्यानं येणाऱ्या कर्मचाऱ्याला 2.25 लाख प्रतिवर्षी देण्यात येत होते. त्यात आता वाढ झाली आहे. पण ती देखील फारच कमी. आता नव्यानं येणाऱ्या कर्मचाऱ्याला 3.5 लाख प्रतिवर्ष वेतन देण्यात येत आहे. यावरुन असं दिसून येतं की, नव्या कर्मचाऱ्यांच्या पगारात फार वाढ झालेलीच नाही.

पै हे 1994 ते 2006 पर्यंत इन्फोसिसमध्ये सीएफओ म्हणून कार्यरत होते. पै यांच्या मते, 'नव्या कर्मचाऱ्यांचे पगार वाढवले गेले पाहिजे. जर तुम्ही वेतनाता वाढ केली नाही तर तुमच्याकडे चांगलं टॅलेंट येणार नाही.'